
न्यायालयाच्या आदेशानंतरही कधी पोलीस तर कधी मनुष्यबळाचे कारण देत भिवंडीतील 291 अनधिकृत इमारतींवर हातोडा टाकला जात नव्हता. मात्र आता ही कारवाई फास्ट ट्रॅकवर करण्यात येणार असून दर महिन्याला दहा बेकायदा इमारती पाडण्याचे टार्गेट पालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत. यासाठी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनधिकृत बांधकामांचा आढावा घेत एक अॅक्शन प्लॅनच तयार करण्यात आला आहे. या मोहिमेसाठी प्रत्येक प्रभागात अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे.
भिवंडी शहरात जिलानी इमारत दुर्घटनेत 39 रहिवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला होता. स्वतः न्यायालयाने स्युमोटो दाखल करून भिवंडीतील 291 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून दिरंगाई केली जात होती. दरम्यान, या गंभीर मुद्द्यावर आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी पालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सदर आढावा बैठकीस उपायुक्त विक्रम दराडे, अनधिकृत बांधकाम अतिक्रमण नियंत्रण अधिकारी अरविंद घुगरे व सर्व बीट निरीक्षक उपस्थित होते.
काही बांधकामे नियमित करण्याचा विचार
काही बांधकामे नियमित करता येत असतील तर नियमानुसार दंड आकारून नियमित करणेबाबत प्रस्ताव सहाय्यक संचालक, नगररचना विभागाकडे सादर करण्यात येणार आहे. प्रभाग स्तरावर अनधिकृत व धोकादायक इमारतींवर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल दर आठवड्याला सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
…तर अधिकारी जबाबदार !
आयुक्त अनमोल सागर यांनी अनधिकृत बांधकामांसंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण 291 अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार दर महिन्याला प्रत्येक प्रभागात किमान दोन अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकण्याचे टार्गेट दिले गेले आहे. त्यासाठी प्रभागात बीट निरीक्षकांना सहाय्य करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारवाई करताना कामचुकारपणा केल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे