
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न घेऊन राज्य सरकारने लोकशाहीचा मुडदा पाडला आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून सत्तेवर गुंडांचे तारणहार बसल्यानेच ही वेळ आली आहे. या तारणहारांना आता पालिका निवडणुकीत गाडून टाका, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी भिवंडी येथे बोलताना केले आहे. शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये झालेल्या पदाधिकारी व शिवसैनिकांच्या मेळाव्यात राऊत बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी भाजप तसेच मिंध्यांवर जोरदार टिकास्त्र सोडले.
ते म्हणाले की, लाचारीसाठी दिल्लीश्वरांचे पाय चाटणारे सध्या सत्तेवर बसले आहेत. गुंडांचे सर्वत्र साम्राज्य वाढले असून एकनाथ शिंदे यांच्यावर तर आता गुवाहटी नव्हे तर सतत दिल्लीच्या वाऱ्या करण्याची वेळ आली आहे. भाजपनेच आता या गद्दारांना तुरुंगात टाकण्याची तयारी सुरू केली असल्याचे ही विनायक राऊत यांनी सांगितले.
निवडणुकीत गद्दारांना घरचा रस्ता दाखवणार; दिवा येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा दणदणीत मेळावा
यावेळी उपनेते विश्वास थळे, अल्ताफ शेख, ज्योती ठाकरे, जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ तारे, सहसंपर्कप्रमुख सोन्या पाटील, किशोर पवार, ग्रामीण जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, शहर जिल्हाप्रमुख मनोज गगे, शहरप्रमुख प्रसाद पाटील, तालुकाप्रमुख कारसन ठाकरे, महिला शहर संघटक वैशाली मेस्त्री, महानगरप्रमुख अरुण पाटील, आशा रसाळ आदी उपस्थित होते.