शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांचे फुकटचे श्रेय मिंधे सरकारकडून घेतले जाते यात आश्चर्य नाही. परंतु आज तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कहरच केला. उद्धव ठाकरे यांनी 2022 मध्ये ज्या मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन केले होते त्याचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांनी पुन्हा केले. हा श्रेय लाटण्याचाच प्रकार असून भूमिपूजन झाले होते तर मिंधे सरकारने गेल्या दोन वर्षांत तिथे मराठी भाषा भवन का उभारले नाही, असा सवाल केला जात आहे.
चर्नी रोड येथील जवाहर बाल भवन परिसरात उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याच मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन 2 एप्रिल 2022 रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, शिवसेना खासदार अरविंद सावंत, पालकमंत्री अस्लम शेख आदी उपस्थित होते.
मराठी भाषा भवन मुख्य केंद्र उभारणीकरिता जवाहर बाल भवन, चर्नी रोड, मुंबई येथील भूखंडावरील शालेय शिक्षण विभागाचे बांधकाम वगळता रिक्त भूखंड विनामोबदला मराठी भाषा विभागास देण्याचा निर्णय झाला होता. सुमारे 2100 चौ.मी. क्षेत्रावर मराठी भाषा भवन उभारण्यात येणार होते. त्यासाठी अंदाजे 126 कोटी रुपये एवढा खर्च येणार होता.
महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर मिंधे सरकार सत्तेवर आले, परंतु मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी मराठी भाषा भवनाच्या उभारणीकडे गांभीर्याने लक्षच दिले नाही. सुरूवातीची जागा बदलून दुसरी जागा निवडली गेली. त्याचप्रमाणे आधी ठरलेल्या योजनेतही बदल केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या जागेवर मराठी भाषा भवनाची वास्तू कधीच उभी राहिली असती, पण मिंधे सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आणि मंत्री सुभाष देसाई यांनी प्रयत्न केले होते. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचे श्रेय लाटतानाच मिंधे सरकारने मराठी भाषा भवनाचे श्रेय लाटण्याचाही आज प्रयत्न केला.