मध्य प्रदेशच्या उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिराचे नियम तोडल्याचे प्रकरण समोर आले आहे. महाकाल मंदिराच्या गर्भगृहात जाऊन पूजाअर्चा करण्याची कोणालाच परवानगी नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, पत्नी आणि दोन अन्य लोकांनी गर्भगृहात जाऊन पूजा केल्याचा गंभीर आरोप आहे. मागच्या वर्षी मंदिर प्रशासनाने मंदिराच्या गर्भगृहात प्रवेशबंदी केली होती. मात्र, वेळोवेळी व्हीआयपीच्या नावाने या नियमांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जातात.
जागरणच्या वृत्तानुसार, गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीसह अन्य दोघांनी महाकाल मंदिराच्या गर्भगृहात जाऊन पूजाअर्चा केली. त्यांनी जवळपास सहा मिनीटे तिथे पूजा केली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत मंदिराचे सुरक्षा प्रभारी जयंत राठोड आणि गर्भगृहाचे निरीक्षक उपस्थित होते.
गेल्या वर्षी पुजारी सोडून इतर सर्वांना गर्भगृहात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. असे असतानाही नियम मोडण्याचा प्रकार सुरूच आहे. गर्भगृहात कोणालाही प्रवेश दिला जात नाही, असे जिल्हाधिकारी आणि महाकाल मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणाले. तर दुसरीकडे प्रशासक गणेश धाकड कारवाईबाबत बोलले आहेत. याबाबत गर्भगृह निरीक्षक आणि इतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान, तरानाचे आमदार महेश परमार यांनीही गर्भगृहात व्हीआयपी प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मंदिराच्या नियमानुसार, भाविकांना 50 फुट अंतरावरून महाकालचे दर्शन दिले जाते. गर्भगृहात पुजाऱ्यांशिवाय अन्य कोणी जात नाही.