पावसाळ्यात भोस्ते घाट धोकादायक होण्याची भीती, दरडीची माती,दगड रस्त्यावर येण्याची शक्यता

623

मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात दरडीची माती आणि दगड रस्त्यावर येण्याची भीती वर्तवली जात आहे. ही दगड,माती रस्त्यावर येऊ नये यासाठी ठेकेदाराने कोणतीच खबरदारी घेतली नसल्याचाही आरोप केला जात आहे. जर ही दगड, माती रस्त्यावर आली तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाटातील डोंगरावरील माती आणि दगड पाऊस सुरु होण्यापूर्वी काढून टाकण्यात यावी अशी सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केली होती. पाऊस सुरु होण्यापूर्वी दरडीची माती आणि दगड काढून दरडीला जाळी बसवणे आवश्यक होते. मात्र त्यासाठीचे कोणतेही काम अद्याप झालेले नाहीये.

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणादरम्यान भोस्ते घाट कापण्यात आला होता. चिपळूणकडून मुंबईकडे जाताना उजव्या बाजूला असलेल्या डोंगराचे खोदकाम करण्यात आले. इथली माती आणि दगडांचा उपयोग रस्त्याच्या भरावासाठी करण्यात आला. मात्र काही दगड आणि मातीचे ढीग आजही डोंगरावरच पडलेले आहेत. पावसाळ्यात ही माती आणि दगड रस्त्यावर येऊ नये यासाठी ठेकेदाराने आवश्यक ती उपाययोजना करायला हवी होती. पाऊस सुरु झाला तरी दगड, माती रस्त्यावर येण्यापासून रोखण्यासाठी खबरदारी घेण्यात आली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाट हा धोकादायक घाटांपैकी एक घाट आहे. एका बाजूला खोल दरी आणि नागमोडी वळणे यामुळे या घाटातून वाहने हाकताना चालकांची कसोटी लागते. पावसाळ्यात दरड रस्त्यावर येण्याचा धोका असल्याने पावसाळ्यात हा घाट अधिकच धोकादायक होतो. हे ओळखून महामार्ग चौपदरीकरणादरम्यान काही अवघड वळणे काढून टाकण्यात आली. यामुळे अपघातांचा धोका काही अंशी कमी झाला आहे. जर घाटातील दगड, माती रस्त्यावर येण्यापासून रोखण्यासाठी आत्ताच प्रयत्न झाले तर प्रवाशांचा प्रवास अधिक निर्धोक होऊ शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या