भूपेश बघेल यांच्या घरी ईडीची धाड; मुलाला अटक, कथित दारू घोटाळाप्रकरणी कारवाई

कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी आज छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या भिलई येथील निवासस्थानी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकली. या कारवाईत भूपेश बघेल यांच्या मुलाला अटक करण्यात आली. पहाटे टाकलेल्या छाप्यानंतर ईडीने चैतन्य बघेल यांना ताब्यात घेतले. भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कारवाईदरम्यान बघेल यांच्या घराबाहेर बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आणि बघेल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी दिली. बॅरिकेड्स तोडून बघेल यांच्या निवासस्थानी परिसरात सर्वजण गोळा झाले. छत्तीसगडमधील कथित दारू घोटाळ्यात 2100 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा ईडीचा दावा आहे.

ही भेट आयुष्यभर लक्षात राहील

मोदी आणि शहा यांनी दिलेल्या भेटवस्तू जगातील कोणत्याही लोकशाहीत कोणीही देऊ शकत नाही. माझ्या वाढदिवशी, दोन्ही या आदरणीय नेत्यांनी माझ्या सल्लागाराच्या आणि दोन ओएसडींच्या घरी ईडी पाठवली होती. आता माझा मुलगा चैतन्यच्या वाढदिवशी ईडीने माझ्या घरावर छापा टाकून मुलाला अटक केली. या भेटवस्तूंसाठी धन्यवाद! मी त्या आयुष्यभर लक्षात ठेवीन, असेही भूपेश बघेल म्हणाले.

मालकांना खूश करण्यासाठी ईडीला पाठवले

विधानसभेत सभागृहात आम्ही तमनारमध्ये अदानींसाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांचा मुद्दा उपस्थित करण्याच्या तयारीत होतो, तेव्हा मोदी आणि शहा यांनी त्यांच्या मालकांना खूश करण्यासाठी ईडीला माझ्या घरी पाठवले. ते देशभरातील विरोधी नेत्यांना लक्ष्य करत आहेत. असा आरोप भूपेश बघेल यांनी केला. कितीही प्रयत्न केला तरी मी झुकणार नाही, मोडणार नाही, असेही ते म्हणाले.