वडिलांचं नाव फादर, आईचं नाव इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया; मतदार यादीतला अजब प्रकार पाहून मतदार गोंधळले

बिहारची विधानसभा निवडणूक जस जशी जवळ येतेय दररोज मतदार यादीबाबत नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. बिहार मतदार यादीतून 65 लाख लोकांची नावे वगळण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मतदार याद्यांमधला अजून एक गोंधळ समोर आला आहे. मतदार याद्यांमध्ये काही लोकांच्या नावांमध्ये चुका असल्याचे समोर आले आहे. वडिलांच्या नावापुढे फादर, नवऱ्याच्या नावापुढे हसबैंड तर आईच्या नावापुढे चक्क इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया लिहलेले आहे. त्यामुळे

निवडणूक आयोग मतदारांसाठी विशेष सखोल आढावा मोहीम (एसआयआर) राबवत आहे. याअंतर्गत बिहारची प्रारूप मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीतील नोंदीतून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यात चक्क पतीच्या नावासमोर ‘हसबैंड हसबैंड’, पित्याच्या नावापुढे ‘फादर फादर’ आणि आईच्या नावासमोर ‘इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया’ असे लिहिले आहे.

बिहारची प्रारुप मतदार यादी 1 ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आली असून त्यावर आता दावे आणि हरकती मागवण्यात येणार आहेत. त्या मतदार यादीतील अजब नोंदींची छायाचित्रे सोशल मिडीयात भलतीच व्हायरल झाली असून निवडणूक आयोगाच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. मतदार यादीच्या विशेष आढावा मोहिमेदरम्यान समोर आलेल्या धक्कादायक नोंदींमध्ये मतदारांची नावे, त्यांच्या पालकांची नावे आणि धर्म यांच्या संदर्भात अनेक तथ्यात्मक चुका समोर आल्या आहेत. त्या चुका केवळ हास्यास्पद नसून त्यावर अनेकांनी चिंता व्यक्त करुन निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

प्रारुप मतदार यादीमध्ये एका मतदाराचे नाव ‘मधु कुमारी कुमारी’ आणि तिच्या पतीचे नाव ‘पती पती’ असे लिहिले आहे. दुसऱ्या नोंदीमध्ये मतदाराचे नाव ‘नेहा कुमारी कुमारी’ आणि आईचे नाव ‘भारतीय निवडणूक आयोग निर्मला देवी’ असे लिहिले आहे. व्हायरल याद्या पाहून लोकांनी सोशल मिडियात निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर खरमरीत कमेंट केल्या आहेत. सांप्रदायिक आणि सामाजिक रचनेशी संबंधित देखील अनेक ठिकाणी विसंगती आढळल्या आहेत. मतदार यादी तयार करताना कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घरोघरी न जाताच मतदारांची माहिती नोंदवल्याचे यातून उघडकीस आले आहे.