
छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. 17 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दोन महिलांसह चार नक्षलवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला आहे. शनिवार संध्याकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. रविवारी दुपारपर्यंत ही चकमक सुरू होती. या कारवाईत सुरक्षा दलाने हे यश मिळवले आहे.
बिजापूर जिल्ह्यातील नैऋत्य भागातील बासगुडा आणि गंगलुर पोलिस ठाण्याच्या सीमावर्ती जंगलात माओवादी असल्याच्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. या चकमकीत दक्षिण उपक्षेत्रीय ब्युरोचे चार माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यात तीन एसीएम स्तर आणि एक पक्ष सदस्य कमांडर यांचा समावेश आहे.
चकमकीच्या ठिकाणाहून एक एसएलआर, एक इन्सास, एक 303 रायफल, एक 12 बोर बंदूक, बीजीएल लाँचर, सिंगल शॉट शस्त्रासह मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर नक्षलवादी संबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या. गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबविण्यात आली. बीजापूरचे पोलिस अधीक्षक श्री. जितेंद्र यादव यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या नैऋत्य भागात माओवादी कारवायांबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरजी बिजापूरच्या पथकाने शोध मोहीम राबविली.
या कारवाईदरम्यान शनिवारी संध्याकाळी पोलिस दल आणि माओवाद्यांमध्ये अधूनमधून चकमकी झाल्या. चकमकीनंतर, घटनास्थळाच्या शोध दरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले. हुंगा, एसीएम, प्लाटून क्रमांक 10, दक्षिण उपक्षेत्रीय ब्युरो (5 लाख रुपयांचे बक्षीस), लक्खे, एसीएम, प्लाटून क्रमांक 30, दक्षिण उपक्षेत्रीय ब्युरो ( 5 लाख रुपयांचे बक्षीस), भीमे, एसीएम, दक्षिण उपक्षेत्रीय ब्युरो ( 5 लाख रुपयांचे बक्षीस), निहाल उर्फ राहुल, पक्ष सदस्य (संतोषचा रक्षक, ब्युरो कम्युनिकेशन टीम प्रमुख, 2 लाख रुपयांचे बक्षीस) असा खात्मा झालेल्या नक्षलवाद्यांचे नाव आहे.
बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. म्हणाले की, 2024 मध्ये मिळालेल्या निर्णायक आघाडीला पुढे नेत, 2025 मध्येही, बस्तर विभागात बंदी घातलेल्या आणि बेकायदेशीर सीपीआय (माओवादी) संघटनेविरुद्ध सुरक्षा दलांकडून तीव्र आणि सतत कारवाई केली जात आहे. या कारवाईअंतर्गत, जानेवारी 2024 ते जुलै 2025 पर्यंत 425 कट्टर माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.