
उपनगरातून दक्षिण मुंबईत अवघ्या वीस मिनिटांत पोहोचवणारा मुंबई सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) सध्या बाईकस्वार आणि स्पोर्ट्स कारने रेसिंग करणाऱ्या टोळक्यांमुळे जीवघेणा बनला आहे. कोस्टल रोडवर बाईकना बंदी असतानाही तरुणांची टोळकी सायंकाळनंतर बाईक आणि स्पोर्ट्स कार्सची रेसिंग लावून प्रचंड ध्वनिप्रदूषण करत आहेत. त्यामुळे कोस्टल रोडवरून प्रवास करणारे प्रवासी हैराण झाले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या रेसिंगमुळे कोस्टल रोडवर जीवघेणे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोस्टल रोड हा मुंबईत ट्रफिक फ्री वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हजारो कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेल्या कोस्टल रोडची सुरक्षितता हे सरकारचे कर्तव्य आहे; परंतु वाहन चालकांकडून कोस्टल रोडवरील वाहतूक नियमांचे सातत्याने उल्लंघन होऊ लागले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कोस्टल रोडवर पादचारी आणि बाईकस्वारांना बंदी आहे. फेरीवाले आणि विक्रेत्यांनाही तिथे प्रवेश नाही. मात्र वांद्रे येथील काही फेरीवाले कोस्टल रोडवर व्यवसाय करू लागले आहेत. त्यांना पोलिसांकडून कोणताही मज्जाव करण्यात येत नाही.
रात्रीच्या वेळी कोस्टल रोडवर उच्चभ्रू नागरिकांच्या मोठ्या कर्कश आवाज करणाऱ्या स्पोर्ट्स कार आणि कस्टमाईज्ड मोटारींच्या शर्यती लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होऊन रहिवाशांना त्रास होऊ लागला आहे. स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांनी संबंधित विभागांकडे अनेकदा तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही.
कडक कारवाई करा, अंबादास दानवे यांचे सचिव, पोलीस महासंचालकांना पत्र
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्यासह गृह विभाग, नगरविकास विभागाला पाठवलेल्या पत्रात ही सर्व माहिती नमूद केली आहे. कोस्टल रोडवर नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे दानवे यांनी त्या पत्रात केली आहे.