
पाकिस्तानने अमेरिका आणि ब्रिटनसाठी 30 वर्षे दहशतवाद पोसला आहे, असे विधान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केले होते. त्यांच्या विधानाचा दाखला देत पाकिस्तान दहशतवाद पोसत असल्याने त्यांनीच जाहीर केले आहे, अशा शब्दांत हिंदुस्थानने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये घेरले होते. त्यानंतर हा मुद्दा जागतिक स्तरावरही चर्चेचा ठरला. पाकिस्तानच दहशतवाद्यांचा पोशिंदा आहे, हे पुन्हा एकदा उघड झाले. आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनीही पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी संबंध हे उघड गुपीत असल्याचे सांगत पुन्हा एकदा पाकिस्तान आणि दहशतवाद यांचा संबंधांचा कबुलीजबाबच दिला आहे.
संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या विधानाबाबत भुट्टो म्हणाले की, दहशतवाद्यांशी संबंध हा पाकिस्तानचा इतिहास आहे, ते उघड गुपीत आहे. या संबंधांमुळे पाकिस्तानचे नुकसान झाले आहे. आमचे नुकसान झाले असले तरी, त्यातून आम्ही एक धडाही घेतला आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही अंतर्गत सुधारणा देखील केल्या आहेत. पाकिस्तानच्या इतिहासाचा विचार केला तर दहशतवाद्यांशी संबंध दुर्दैवी आहेत. आम्हाला युद्ध नको आहे पण जर कोणी सिंधूचे पाणी रोखले तर आम्हीही युद्धासाठी तयार आहोत, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत कबूल केले होते की पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा देण्याचा आणि दहशतवाद्यांना निधी देण्याचा इतिहास आहे. आम्ही गेल्या 30 वर्षांपासून अमेरिका आणि ब्रिटनसाठी हे काम करत आहोत. तो इतिहास होता. मात्र, आता पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबा संपला आहे, अशी सारवासरवही त्यांनी केली. मात्र, आता पुन्हा एकदा बिलावल भुट्टो यांच्या विधानाने पाकिस्तानच दहशतवादाचा पोशिंदा असल्याचे स्पष्ट झाले आहे.