
अमेरिकेतील लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित प्रकरणाने सध्या संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले असून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या वादाच्या केंद्रस्थानी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांचे नाव आल्याने त्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणाशी संबंधित नवीन कागदपत्रे आणि ईमेल सार्वजनिक केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर गेट्स यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी एपस्टीनसोबत घालवलेल्या वेळेबद्दल जाहीर माफी मागत, त्याच्यासोबतच्या संबंधांचा आपल्याला प्रचंड पश्चाताप होत असल्याचे म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बिल गेट्स यांनी त्यांच्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एपस्टीनने स्वतःलाच एक ईमेल लिहिला होता, जो कधीही पाठवण्यात आला नव्हता, असा दावा गेट्स यांनी केला आहे. हा ईमेल पूर्णपणे खोटा असून एपस्टीनचा त्यामागे नक्की काय हेतू होता, हे आपल्याला ठाऊक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसासोबत आपला संबंध आला, ही मोठी चूक होती आणि त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो. असे ते यावेळी म्हणाले.
2019 मध्ये तुरुंगात असताना आत्महत्या केलेल्या जेफ्री एपस्टीनच्या चौकशीशी संबंधित लाखो पानांची नवीन कागदपत्रे अमेरिकेच्या न्याय विभागाने अलीकडेच जारी केली आहेत. या दस्तऐवजांमध्ये बिल गेट्स यांच्यासह जगातील अनेक नामवंत व्यक्तींच्या नावांचा उल्लेख आहे. यावर गेट्स यांच्या प्रवक्त्यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, ही सर्व कागदपत्रे केवळ एपस्टीनची निराशा दर्शवतात. बिल गेट्स यांनी त्याच्याशी कोणतेही कायमस्वरूपी संबंध ठेवले नाहीत, त्यामुळे त्यांना बदनाम करण्यासाठी आणि जाळ्यात अडकवण्यासाठी एपस्टीन कोणत्याही थराला जाऊ शकत होता, हेच यातून सिद्ध होते, असे म्हटले आहे.
































































