अजित पवारांसोबत जाणे हे आमचे दुर्देव! भाजपने पुन्हा लाथाडले

मिंध्याचे वाचाळ मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीसोबत बसल्याने ‘उलटी’ होते असे बनचुके विधान केल्यानंतर आता अजित पवारांसोबत जाणे हे आमचे दुर्देव आहे, अशा शब्दांत भाजपनेही राष्ट्रवादीला लाथाडले आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी अहमदपुरात जाहीर सभेत ही भूमिका मांडली.

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रत्येक मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढली आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, उपाध्यक्ष अशोक केंद्र्रे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भारत चामे यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या यात्रेत स्थानिक भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यांच्या भ्रष्टाचाराचा जाहीर पंचनामा भाजपच्या नेत्यांनी करून अहमदपुरात विधानसभेसाठी शड्डू ठोकला. आता पुन्हा बाबासाहेब पाटील यांना आमदार होऊ देणार नाही, अशी शपथच भाजपच्या नेत्यांनी घेतली.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी तर अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्देवी असल्याचे म्हटले. आमच्या नेत्यांनी हा युतीचा घातलेला घाट आम्हाला अजिबात आवडलेला नाही असे म्हणत त्यांनी मोदी-शहांच्या फोडाफोडीवर नापसंतीची मोहोर उमटवली. भाजपने अजित पवारांसोबत जाणे महाराष्ट्रातील जनतेला आवडलेले नाही. लोकसभा निवडणुकीत त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागले असेही ते म्हणाले. अजित पवारांसोबत युती करून चुक झाली, पण आता ती चुक पुन्हा करणार नाही. अहमदपुरची जागा भाजपला सुटली नाही तर आम्ही अपक्ष लढणार अशी घोषणाही हाके यांनी केली.