भाजप तपास यंत्रणांचा गैरवापर करतात असा आरोप आप नेते मनीष सिसोदिया यांनी केला आहे. तसेच भाजपला वेळीच नाही रोखले तर ते उद्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींना अटक करतील अशी भितीही त्यांना व्यक्त केली.
मनीष सिसोदिया नुकतेच तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यांच्यावर तथाकथित मद्य कर धोरण घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. आता एबीपी न्युज या हिंदी वृत्तवाहिनीला सिसोदिया यांनी मुलाखत दिली आहे. त्यात सिसोदिया म्हणाले की, आधी मला अटक केली, नंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक केली. फक्त राजकीय नेत्यांनाच नव्हे तर उद्योजकांनाही तपास यंत्रणांनी लक्ष्य केले आहे. तपास यंत्रणांच्या माध्यमातून उद्योजकांकडून खंडणी गोळा केली जात आहे असा आरोप सिसोदिया यांनी केला आहे. तसेच भाजपकडून सतत तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. जर त्यांना आताच नाही रोखलं तर ते उद्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांनाही अटक करतील अशी भिती सिसोदिया यांनी व्यक्त केली आहे.
अटक झाल्यानंतर मी 6-7 महिन्यानंतर मी बाहेर येईन असा अंदाज सिसोदिया यांनी व्यक्त केला. पण मला बाहेर येण्यासाठी 17 महिने लागले, एखादा उद्योजक जर 17 महिने तुरुंगात राहिला तर त्याचा उद्योग व्यवसाय ठप्प होऊन जाईल. याचाच धाक आणि भिती दाखवून खंडणी वसूली सुरू आहे असेही सिसोदिया म्हणाले.