
नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असणारे अध्यक्ष पद आपल्या पक्षाला मिळावे असा भाजपचा आग्रह आहे. त्याबदल्यात महिला आर्थिक विकास महामंडळ राष्ट्रवादीला देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून चाकणकर पायउतार झाल्यानंतर या पदासाठी राष्ट्रवादी आणि भाजपात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सत्तावाटपात महिला आयोगाचे अध्यक्ष पद राष्ट्रवादीच्या वाटय़ाला असल्यामुळे ते आपल्या पक्षालाच मिळावे अशी भूमिका त्या पक्षाची आहे, तर खरात प्रकरणामुळे राज्यात निर्माण झालेला असंतोष आणि याआधीच्या अध्यक्षांची वादग्रस्त कारकीर्द पाहता महिला आयोगाचे अध्यक्ष पद भाजपच्या ताब्यात ठेवण्याची भूमिका घेतली आहे.

























































