कशी नशिबानं थट्टा मांडली…रावसाहेब दानवे यांच्यावर अशोक चव्हाणांना पोटाशी धरण्याची वेळ!

प्रताप पाटील चिखलीकरांचा पराभव अशोक चव्हाणांमुळे झाला नाही, असा दिलखुलास दावा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. ‘आदर्श डीलर’ला पोटाशी धरण्याची वेळ भाजपवर आली! विशेष म्हणजे अशोक चव्हाणांमुळेच आपला पराभव झाला, असे पुराव्यानिशी सांगणारे प्रताप पाटील चिखलीकरांनाही त्यांच्याच स्वपक्षाने तोंडघशी पाडले.

नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर चारीमुंड्या चित झाले. आपल्या पराभवास अशोक चव्हाण हेच जबाबदार असल्याचे चिखलीकरांनी कानीकपाळी ओरडून सांगितले. परंतु, भाजपनेच चिखलीकरांच्या नांग्या ठेचल्या. त्यामुळे चिखलीकरांना पत्रकार परिषद घेऊन चव्हाण पराभवासाठी जबाबदार नसल्याचा खुलासा करावा लागला. नांदेडमधील पराभवाची समीक्षा करण्याची जबाबदारी जालन्यात पराभूत झालेले माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टाकण्यात आली होती.

पक्षापेक्षा चव्हाण मोठे
लोकसभेतील पराभवानंतर भाजपने नांदेडात जोरबैठका सुरू केल्या आहेत. मात्र, पक्षाच्या कोणत्याही बैठकीला अशोक चव्हाण वा त्यांचे समर्थक उपस्थित राहिले नाहीत. आज रावसाहेब दानवे यांनी घेतलेल्या बैठकीलाही चव्हाणांनी दांडी मारली. विशेष म्हणजे गेल्या आठ दिवसांपासून अशोक चव्हाण नांदेड मुक्कामीच होते. आज बैठकीच्या दिवशीच ते मुंबईला काम असल्याचे सांगून निघून गेले. त्यामुळे अशोक चव्हाण हे पक्षापेक्षा मोठे आहेत का, अशी चर्चा बैठकीच्या ठिकाणी रंगली.

अशोक चव्हाण भाजपचे नेते
प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पराभवाची कारणे वेगवेगळी आहेत. अशोक चव्हाण हे त्यांच्या पराभवासाठी जबाबदार नाहीत, असा छातीठोक दावा रावसाहेब दानवे यांनी केला. अशोक चव्हाण भाजपचे नेते आहेत. काँग्रेस सोडून ते भाजपत आल्यानंतर निश्चितच आम्हाला विक्रमी विजयाची हमखास खात्री होती. परंतु, मतदारांनीच ठरवले होते, कुणाला पाडायचे. त्यामुळे हा पराभव मतदारांनी केला आहे, असेही दानवे म्हणाले.