
बेस्ट कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत भाजपने दिवसाढवळय़ा पैसे वाटपाचा प्रयत्न सुरू केल्याचे शुक्रवारी परळमधील बेस्ट कामगार वसाहतीत उघडकीस आले. कंत्राटदारांच्या कामगारांमार्फत पैसे वाटपाचा प्रयत्न केला गेला. आमच्या कार्यकर्त्यांनी त्या दलालांना रंगेहाथ पकडले. निवडणुकीत शिवसेना-मनसेचाच विजय निश्चित असल्याने भाजपने पैशांचा वापर सुरू केल्याचा आरोप बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला.
दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. व्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेना प्रणीत ‘उत्कर्ष पॅनेल’चा दबदबा आहे. त्यामुळे भाजपच्या सहकार समृद्धी पॅनेलने गैरमार्गांनी मतदारांना भुलवण्याचे प्रकार सुरू केले आहेत, असा दावा बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास परळच्या बेस्ट कामगार वसाहतीमध्ये पंत्राटी दलालांमार्फत पैसे वाटपाचा प्रयत्न केला गेला. ते सामान्य कामगार होते. त्यामुळे त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले नाही. अशा प्रकारांवर आमच्या कार्यकर्त्यांचे लक्ष असून भाजपचे गैरप्रकार यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा सुहास सामंत यांनी दिला.
बिर्याणी, कपबशी वाटपाचाही प्रयत्न
भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या पॅनेलची निशाणी असलेल्या कपबशींचे वाटप करण्याचा प्रयत्न कामगार वसाहतींच्या गेटवर केला आहे. इतकेच नव्हे तर बस डेपोंच्या बाहेर बिर्याणीचेही वाटप केले. पतपेढी निवडणुकीतील मतदारांना आमिष दाखवण्याचे हे प्रकार रोखले पाहिजेत. यासंदर्भात रीतसर तक्रार करून कारवाईची मागणी करणार असल्याचे सुहास सामंत यांनी सांगितले.