
आठ दिवसांपूर्वी भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी दिलेल्या चिथावणीवरून त्यांच्या समर्थकांनी सशस्त्र हल्ला करून दोघांना जखमी केले. त्यातील राहुल धोत्रे (27) याचा आज शुक्रवारी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे पंचवटी परिसरात तणाव निर्माण झाला होता. धोत्रेच्या नातलगांनी जिल्हा रुग्णालय व पोलीस आयुक्तालयात जाऊन माजी नगरसेवक निमसेंसह फरार संशयितांना अटक करण्याची मागणी केली.
नांदूर नाका परिसरात शुक्रवारी, 22 ऑगस्ट रोजी भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या नातलगाचा किरकोळ कारणावरून सनी राजू धोत्रे याच्याशी वाद झाला. त्यानंतर निमसे यांनी सायंकाळी धोत्रे राहत असलेल्या भागात जाऊन गर्दी जमवली. शिवीगाळ व दमदाटी करून चिथावणी दिली. त्यांच्या समर्थकांनी लाठय़ाकाठय़ा व तीक्ष्ण हत्यारांनी दोन तरुणांना गंभीर जखमी केले.
या प्रकरणी पोलिसांनी निमसे यांच्यासह एकूण बारा संशयितांवर गुन्हा दाखल केला. मेघराज सुनील जोजारे (25), गणेश राजाभाऊ निमसे (23), रोशन लक्ष्मण जगताप (35), अक्षय अशोक पगार (30), सुधीर ऊर्फ गोटीराम माधवराव निमसे (39), पवन निमसे, सुमित हांडोरे या सात जणांना अटक केली. माजी नगरसेवक निमसे, संतोष मते, सचिन दिंडे, स्वप्नील बागुल यांच्यासह पाचजण फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.