
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारसभेत भाजपचेच बंडखोर कार्यकर्ते आक्रमक झाले. भाजप कार्यकर्ता मनोज पोतराजे यांनी त्याच्या समर्थकांसह बावनकुळे यांच्या प्रचार सभेत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पोतराजे याला अडवून प्रचार सभेतून हुसकावून लावलं. यावेळी AB फार्म चोर है, म्हणत नारेबाजी करण्यात आली.
चंद्रपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाषण सुरू असतानाच भाजपाचा बंडखोर उमेदवार मंचावर चढला. अचानक आलेल्या या उमेदवाराला आमदार किशोर जोरगेवार यांनी थांबवून विचारणा केली. ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या या अपक्ष उमेदवाराने हातवारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. भाषण प्रभावित होत असल्याचे लक्षात येताच त्याला खाली उतरविण्यात आले. या प्रकारामुळे काही क्षण गोंधळ उडाला. बाहेर नेऊन त्याला धक्काबुक्की व मारहाण झाल्याचीही माहिती आहे.
दरम्यान, मनोज पोतराजे यांच्या पत्नी पूजा पोतराजे यांना भाजपकडून या प्रभागातून उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र ऐनवेळी पक्षाने हा निर्णय बदलला आणि पूजा पोतराजे यांच्या ऐवजी आशा देशमुख यांना AB फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी दिली. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या पूजा पोतराजे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे.


























































