विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच कोकणात भाजपला खिंडार पडले आहे. कोकणातील बडे नेते राजन तेली यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती पक्षप्रवेश केला. शिवबंधन बांधत राजन तेली स्वगृही परतले. कोकण आणि शिवसेना एकजीव आहेत, कोकण आणि शिवसेना वेगळे होऊ शकत नाही हे आगामी निवडणुकीत कळेलच, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आज पाच पक्षप्रवेश झाले आहेत. दररोज चांगली माणसं आणि कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. राजन तेली मूळचे आमचे होते. मधल्या काळात त्यांची दिशाभूल झाली होती. ज्या दिशेने ते जात होते हे त्यांच्या लक्षात आले की ही त्यांची दिशा नव्हती. आता ते स्वगृही परत आले आहेत. मला खात्री आहे की राजन तेली परत आले आहेत तसे अनेक कार्यकर्ते दिशा भुलून गेलेले आहेत ते शिवसेनेत परत यायला लागलेले आहेत. एकूणच काय राज्यातील राजकीय वातावरण बदलेले आहे. कोणत्याही परिस्थिती महाविकास आघाडीचे सरकार येणार. महाविकास आघाडीचे सरकार आणणारच हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
राजन तेली यांचा संघर्ष संपवल्याचा अंतिम स्वरूप देण्यासाठी ते शिवसेनेत परत आले आहेत. कधीकधी गोलमाल होतो. मुंबईत अमोल किर्तीकरांच्या मतदारसंघात झाला तसा कोकणातही झाला. पण कोकण आणि शिवसेना एकजीव आहे. कोकणापासून शिवसेनेला आणि शिवसेनेला कोकणपासून कोणी तोडू शकत नाही हे येणाऱ्या निवडणुकीत सिद्ध होईल. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.