राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत ‘अजित पवार हाय हाय’, ‘पालकमंत्री हाय हाय..’ अशी तुफान घोषणाबाजी केली. परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी यावेळी मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. यामुळे महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचेच दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा जुन्नर तालुक्यात पोहोचली असता महायुतीतील अंतर्गत वाद उफाळून आला. नारायणगाव येथे जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवण्यात आले. शासकीय कार्यक्रम घेऊनही घटकपक्षांना डावलले जात असल्याचा आरोप यावेळी आशा बुचके यांनी केला.
पालकमंत्र्यांची मस्ती खपवून घेतली जाणार नाही. मी फक्त राष्ट्रवादीचा पालकमंत्री असून महायुतीशी माझा संबंध नाही असे अजित पवारांनी जाहीर करावी अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली. अजित पवार पालकत्वाची भूमिका पाळत नाहीत, असा आरोपही भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी आशा बुचके यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळाबाहेर रस्त्यावर ठिय्या मांडल्याने वाहतुकीचाही बोजवारा उडाला.
View this post on Instagram
अजित पवार चोरून चोरून बैठका घेतात. प्रशासनाचा गैरवापर करतात. आमदार अतुल बेंडक हा राष्ट्रवादीचाच कार्यक्रम असल्याचे सांगतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटोही गायब करतात. कोणत्याही बाबतीत आम्हाला विश्वास घेतले जात नाही. त्यामुळे महायुती मान्य नसेल तर अजित पवार यांनी ते जाहीर करावे, अशी मागणी आशा बुचके यांनी माध्यमांशी बोलताना केली.