लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला आहे. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमधील जनतेने भाजपला दणका दिल्यामुळे भाजपचे अब की बार चारसो पारचे स्वप्न 240 वरच थांबले व त्यांना जदयू-टीडीपीच्या टेकूंवर केंद्रात सत्ता स्थापन करावी लागली. महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन महिन्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र जिंकण्यासाठी सध्या भाजपची तडफड सुरू असून सध्या भाजपने महाराष्ट्रातील तयारीसाठी गुजरातमधून आमदारांची फौज बोलवली आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या मर्जीतले गुजरातमधील काही आजी माजी आमदार नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभेसाठी गुजरातमधून एक स्पेशल टीम नेमण्यात आली आहे. ही टीम सध्या नाशिकमध्ये आढावा बैठक घेत असल्याचे समजते. साम या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जो महाराष्ट्र देशाला दिशा द्यायचा त्या महाराष्ट्राला अमित शहांच्या मर्जीतले गुजरातचे भाजपा आमदार दिशा दाखवणार का? #महाराष्ट्रधर्म #मराठीबाणा pic.twitter.com/1igMy3f4Ia
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) September 5, 2024
दरम्यान यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे. ”जो महाराष्ट्र देशाला दिशा द्यायचा त्या महाराष्ट्राला अमित शहांच्या मर्जीतले गुजरातचे भाजपा आमदार दिशा दाखवणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत केला आहे.