
कमळाबाईने सत्तेसाठी हिंदुत्व आणि पक्षाची तत्व खुंटीला टांगत एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्याशी राजकीय लव्ह जिहाद सुरू केला आहे. अकोल्याच्या अकोट नगर परिषदेत युती तोडण्याची नौटंकी करणाऱ्या भाजपने स्वीकृत नगरसेवकपदासाठी एमआयएमचा पाठिंबा घेतला. एमआयएमच्या पाठिंब्याने भाजपचे जितेन बरेठिया स्वीकृत नगरसेवक झाले.
भाजपने सातत्याने काँग्रेस आणि मुस्लिमांना विरोध केला. मात्र गेल्याच आठवड्यात त्याच भाजपने अंबरनाथ नगरपरिषदेत सत्तेसाठी काँग्रेससोबत युती केली. अकोल्याच्या अकोटमध्येही एमआयएमसोबत युती केली. त्यातून भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला होता. त्यावरून टीका होताच भाजपने दोन्ही ठिकाणच्या पदाधिकाऱयांना नोटीस बजावून कारवाई केली होती. अशी युती कदापि मान्य नाही सांगत युती तोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र त्यानंतरही भाजपने अकोटमध्ये एमआयएमच्या कुबडय़ा घेतल्या.
कारवाई नाही
एमआयएम ही भाजपची बी टीम आहे, भाजप-एमआयएमची अप्रत्यक्ष युती आहे अशी टीका होत आहे. दुसरीकडे एमआयएमसोबत युती करण्यास कारणीभूत असलेले भाजप आमदार प्रकाश भारसाकळे आणि शहराध्यक्ष हरीश टावरी यांच्यावर भाजपने अद्यापही कारवाई न केल्याने संशय व्यक्त होत आहे.





























































