
भाजपच्या एका आमदाराची घाटकोपरमध्ये दादागिरी पाहायला मिळाली. चुकीच्या दिशेने येणाऱया रिक्षाचालकावर त्या आमदाराने जोर काढला. आमदार असल्याचा माज दाखवत त्यांनी त्या रिक्षाचालकाच्या कानाखाली मारल्याचा एक व्हिडीओ प्रसारित झाला आहे.
घाटकोपर पूर्वेकडे भाजप आमदार पराग शहा यांनी चुकीच्या दिशेने रिक्षा चालविणाऱया चालकाला भररस्त्यात शिवीगाळ करत मारहाण केली. पराग शहा यांनी थेट कायदाच हाती घेतल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र टीका होत आहे. शुक्रवारी पराग शहा हे वल्लभबाग लेन व खाऊ गल्ली येथे पाहणी करण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला. दरम्यान, कोणी वाहतुकीचे नियम मोडत असेल तर त्याची पोलिसांत तक्रार देणे अपेक्षित आहे. आमदार आहे म्हणून थेट शिवीगाळ करत मारहाण करणे हे योग्य नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. याप्रकरणी कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे समजते.
























































