भारतमाता माझी आई आणि डोकं ठेवायला जागा नाही, सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा अहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतमाता माझी आई आणि डोकं ठेवायला जागा नाही… पंतप्रधान मोदी सांगतात देशाच्या गरीबांच्या सन्मानासाठी मोदी  मैदान मे. आणि इथे अधिकारी पैशाची लूट करतात. त्यामुळे अशा केसमध्ये जोपर्यंत चौकशी आणि कोर्टाचा निर्णय अंतिम होत नाही तोपर्यंत अशा अधिकाऱ्यांना निलंबित करा, अन्यथा कोणीही घाबरणार नाही, अशा शब्दांत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज सत्ताधारी पक्षाला घरचा अहेर दिला.

केज नगर पंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेतील निधी गैरव्यवहाराच्या संदर्भात भाजपच्या नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नगर पंचायतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निधीपैकी सुमारे 3.62 कोटी रुपयांच्या गैरवापराची चौकशी करण्यात येणार असून चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल आणि अपहार झालेली रक्कम व्याजासह वसूल केली जाईल असे आश्वासन दिले. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.

क्रिकेट सामन्यांच्या पासवरून फटकेबाजी

वर्ल्ड कप क्रिकेट कपच्या हिंदुस्थान आणि इंग्लड क्रिकेट सामन्याच्या पासेसवरून मुनगंटीवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. इंग्रजांना या देशातून हाकलवून देताना आम्ही होतो की नव्हतो याची कल्पना नाही, पण क्रिकेट मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव होताना बघावे, त्याचा साक्षीदार व्हावे ही भावना आहे. सरकारने देशभक्तीची भावना लक्षात घ्यावी आणि ज्या आमदारांना पासेस पाहिजे त्यांना संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत पास द्यावेत अन्यथा वानखेडे स्टेडियम ताब्यात घ्या अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.