संसदेसाठी ड्रेस कोड हवा, भाजप नेत्याची मागणी; राहुल गांधींच्या कपड्यांवर घेतला आक्षेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेसारख्या संस्थेचा असलेला मान-सन्मान लक्षात घेता, संसदेत विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करण्यास परवानगी दिली जाऊ नये. संसदेचे पावित्र्य आणि त्याचे महत्त्व कायम राहील, अशा प्रकारे सर्व सदस्यांनी कपडे घालणे गरजेचे आहे. तसेच सदस्यांसाठी काही कपड्यांवर बंदी घालण्याची मागणी भाजप नेते जयवीर शेरगिल यांनी केली आहे.

याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझी अशी मागणी आहे की, संसदेसारख्या संस्थेचा असलेला मान-सन्मान लक्षात घेता, संसदेत विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करण्यास परवानगी दिली जाऊ नये. राहुल गांधी यांच्यासाठी कदाचित संसदेत शर्टविना येणे, चहाचे घोट घेणे आणि संसदेत एखाद्या ढाब्याप्रमाणे वागणे योग्य असेल. मात्र, संसदेच्या मर्यादांचे पालन व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.

आपल्याच आणखी एका ट्विटमध्ये शेरगिल म्हणतात की, माझी मागणी आहे की, संसदेच्या आत विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करण्यास परवानगी दिली जाऊ नये. देशाच्या संसदेला ‘लोकशाहीचे मंदिर’ म्हणून संबोधले जाते… ज्याप्रमाणे एखादा वकील ‘टी-शर्ट’ आणि ‘कार्गो पँट्स’ घालून न्यायालयात प्रवेश करू शकत नाही, आणि एखादा डॉक्टर ‘हाफ-पँट्स’ घालून शस्त्रक्रिया कक्षात जाऊ शकत नाही, मग एखाद्या संसद सदस्याला (खासदाराला) टी-शर्ट आणि कार्गो पँट्स घालण्याची परवानगी का दिली जावी?… माझ्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांचा कोणताही संदर्भ नव्हता किंवा त्यांचे नावही वापरले गेले नव्हते. परंतु त्या काँग्रेस नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरून त्यांनीही माझाच मुद्दा अधोरेखीत केला आहे, असे शेरगिल म्हणाले.

टी-शर्ट आणि कार्गो पँट्ससारख्या कपड्यांवरची बंदी काटेकोरपणे अंमलात आणली गेली पाहिजे, जेणेकरून उद्या राहुल गांधी आपल्या सहकाऱ्यांना आणि समर्थकांना ‘शर्टलेस’ किंवा टी-शर्ट घालून किंवा ‘हाफ-शॉर्ट्स’ परिधान करून संसदेत येण्याचे आदेश देणार नाहीत. अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये म्हणून, अशा विशिष्ट पोशाखांना संसदेत परवानगी दिली जाऊ नये, असे शेरगिल यांनी म्हटले आहे.