राज्यसभा निवडणुकीबाबत भाजपने डील ऑफर केली होती, फारुक अब्दुल्ला यांचा गौप्यस्फोट

जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणुका पार पडल्या. यापैकी तीन जागांवर नॅशनल कॉन्फरन्सने विजय मिळवला, तर एक जागा भाजपच्या खात्यात गेली. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की भाजपने त्यांच्याशी संपर्क साधून चौथ्या जागेसाठी डील ऑफर केली होती.

शनिवारी (२५ ऑक्टोबर) पत्रकारांशी बोलताना फारूक अब्दुल्ला यांनी राज्यसभेच्या तीन जागा जिंकल्यानंतर म्हणाले की, मी कृतज्ञ आहे की आमच्या पक्षातील सर्व आमदार एकजुटीने उभे राहिले आणि आमच्या पक्षाला यश मिळाले. एकालाही हे लोक फोडू शकले नाहीत. काँग्रेससह इतर पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला.

अब्दुल्ला म्हणाले की, “आम्हाला याचे दुःख आहे की आम्ही चौथी जागाही जिंकू शकलो असतो, पण काही अपूर्ण वचनांमुळे तसे होऊ शकले नाही. आम्ही यामुळे थोडे निराश आहोत, परंतु निवडणुकांमध्ये अशा गोष्टी घडतच असतात.” त्यांनी पुढे सांगितले, “अल्लाहचे आभार मानतो की आमच्या पक्षाने तीन जागांवर विजय मिळवला.”

फारूक अब्दुल्ला पुढे म्हणाले, “भाजपचे नेते आमच्याकडे आले होती आणि त्यांनी आम्हाला निवडणूक न लढवण्याची विनंती केली होती, पण आम्ही त्यांचा प्रस्ताव नाकारला. भाजपने आमच्याशी संपर्क साधून राज्यसभा निवडणुकीतील चौथ्या जागेसाठी सौद्याची ऑफर दिली होती.” त्यांनी सांगितले, “भाजपचे नेते म्हणाले होते की तुम्ही निवडणूक लढवू नका, तीन जागा तुम्ही ठेवा, पण आम्ही नकार दिला आणि स्पष्ट सांगितले की आमचा पक्ष मैदानात उतरेल आणि निर्णय जनतेचाच असेल.”

ते पुढे म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्सने निवडणूक टाळावी आणि त्याऐवजी जागा वाटप करण्यात यावे अशी भाजपची इच्छा होती. पण आमच्या पक्षाने भाजपचा प्रस्ताव ठामपणे नाकारला आणि चौथ्या जागेवरही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेही अब्दुल्ला म्हणाले.