भाजपला अतिआत्मविश्वास नडला; अजित पवारांशी युती केल्यानेच घात

लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा देणाऱया भाजपला 240 पर्यंतच मजल मारता आली. असे असतानाही भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी भाजपला आता आरएसएसची गरज नाही, असे विधान केले. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या मुखपत्रात प्रसिद्ध केलेल्या लेखातून भाजपच्या अपयशाचे पोस्टमॉर्टम केले आहे. अजित पवारांशी पक्षाने युती करतानाच काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतले आणि तिथेच घात झाला. भाजपच्या ब्रॅण्डला मोठा धक्का बसला. निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला. नरेंद्र मोदींचीच लाट असल्याच्या अतिआत्मविश्वासात ग्राऊंड रियालिटीपासून भाजप नेते आणि कार्यकर्ते अनभिज्ञ राहिले, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पक्षाची खरडपट्टी काढली आहे.

‘ऑर्गनायझर’ मासिकाच्या अंकात संघाचे आजीव स्वयंसेवक असलेल्या रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे. महाराष्ट्रात भाजपकडे पुरेसे बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले, असा सवाल लेखात उपस्थित करण्यात आला आहे. ज्या काँग्रेसी विचारसरणीविरोधात वर्षानुवर्षे भाजप लढली त्याच काँग्रेसमधील नेत्यांना भाजपने सोबत घेतले. भगव्या दहशतवादाचे आरोप करणाऱया 26/11ला संघाचे कटकारस्थान म्हणणाऱया आणि संघाला दहशतवादी संघटना असे संबोधणाऱया काँग्रेस नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यामुळे संघ स्वयंसेवकांची मने दुखावली गेली, अशी खंत लेखात व्यक्त करण्यात आली आहे.

केवळ पोस्टर, सेल्फी शेयर करून काही होत नाही

भाजपने समोर ठेवलेले मोठे लक्ष्य प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचंड मेहनत केल्यानंतर प्राप्त होते. सोशल मीडियावर केवळ पोस्टर आणि सेल्फी शेयर करून काही होत नाही, अशा शब्दांत भाजपला लेखातून आरसा दाखवण्यात आला आहे. भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या वलयाचा आनंद घेत राहिले. त्यामुळे लोकांनी भाजपला जागा दाखवून दिली. त्याचा थेट परिणाम निवडणुकीत दिसला. आलेल्या निकालातून हाच संदेश मिळतो की, भाजपला अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असेही लेखात म्हटले आहे.

आरएसएस भाजपची फील्ड फोर्स नाही

लोकसभा निवडणुकीत आरएसएसने भाजपासाठी काहीच केले नाही. कारण, आरएसएस काही भाजपची फील्ड पर्ह्स नाही. भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष असून पक्षाकडे कार्यकर्ते आहेत. पार्टीचा अजेंडा, साहित्य आणि मतदान ओळखपत्रे मतदारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सर्वस्वी भाजपाची होती, याकडेही लेखातून लक्ष वेधण्यात आले आहे. जे मुद्दे आरएसएस आणि देशासाठी हिताचे ठरतात त्याच मुद्दय़ांवर आरएसएस जनजागृती करते असेही लेखात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, भाजप खासदार आणि मंत्र्यांकडे देशातील जनतेप्रति संवेदनशीलताच उरलेली नाही. सर्वसामान्य माणसाला त्यांच्याकडे कुठल्याही समस्या घेऊन जाणे कठीण बनल्याचे लेखात म्हटले आहे.