भाजपच्या तंबूत शिरलेल्या माथेरानच्या दहा नगरसेवकांवर अपात्रतेची तलवार

शिवसेनेशी गद्दारी करत भाजपच्या तंबूत सामील झालेल्या माथेरानमधील दहा नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. शिवसेनेने आक्षेप घेतल्यानंतर रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व नगरसेवकांना नोटीस बजावली असून त्यावर 30 जून रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने या दगाबाजांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

शिवसेनेच्या रूपाली आखाडे, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे, प्रतिभा घावरे, सुषमा जाधव, आकाश चौधरी, राकेश चौधरी, सोनम धाबेकर, चंद्रकांत जाधव या दहा नगरसेवकांनी 27 मे रोजी कोल्हापुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. याविरोधात शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई आणि गटनेते प्रसाद सावंत यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे आक्षेप नोंदविला.

त्यावर प्रशासनाने त्या दहा नगरसेवकांना अनहर्तेची नोटीस बजावली आहे. याबाबत 30 जून रोजी काळी 11 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे माथेरानच्या भाजपवासी नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस, सर्वांना हजर राहण्याचे आदेश

माथेरान गिरिस्थान नगर परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत आणि नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या सुनावणीला सर्व बंडखोर नगरसेवकांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

बंडखोरांना ‘माथेरान चा घाट’ दाखवणार

माथेरान नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता असून प्रेरणा सावंत या लोकनियुक्त नगराध्यक्षा आहेत. त्यामुळे बंडखोरी होऊनही शिवसेनेच्या सत्तेचा झेंडा डौलाने फडकत आहे. याउलट दगाबाजी केलेल्या या नगरसेवकांविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून आगामी निवडणुकीत ‘माथेरान चा घाट’ दाखवण्याचा निर्धार येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या