
राज्यात 29 महानगरपालिकांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा अक्षरश: पाऊस पाडण्यात आला. साम-दाम-दंड-भेदचा पुरेपूर वापर करून निवडणूक लढवण्यात आली. या निवडणुकीची रणधुमाळी शांत होत नाही तोच आगामी काळात जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर देशातील पाच प्रमुख राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजेल. या निवडणुकींमध्येही मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध हातखंडे वापरण्यात येतील. जाहिराती, सभा, डिजिटल प्रचार, मुलाखतींची रीघ लागेल आणि यासाठी प्रचंड पैसाही खर्च करण्यात येईल. अशातच भाजपने 2024-25 या आर्थिक वर्षात निवडणूक आणि प्रचारावर किती खर्च केला याचा डोळे विस्फारणारा आकडा समोर आला आहे.
लोकसभा निवडणूक आणि आठ राज्यांच्या विधासभा निवडणुकीसाठी भाजपने खर्चाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. 2024-25 मध्ये भाजपने निवडणूक आणि प्रचारावर तब्बल 3 हजार 335 कोटी रुपये खर्च केले आहेत. निवडणूक आयोगाने सादर केलेल्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालातून ही माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हा खर्च अडीच पटीने वाढला आहे.
भाजपने 2019-20 या निवडणूक वर्षात निवडणूक आणि प्रचारावर 1 हजार 352 कोटी 92 लाख रुपये खर्च केले होते. त्या तुलनेमध्ये भाजपने 2024-25 या निवडणूक वर्षामध्ये अडीच पट अधिक खर्च केला आहे. 2024-25 आणि त्याआधीचे वर्ष 2023-24 या दोन वर्षांचा एकत्रित विचार केल्यास भाजपने एकूण 5 हजार 92 कोटी 42 लाख रुपये प्रचारावर खर्च केले आहेत. 2019 च्या वेळी हाच आकडा 2 हजार145 कोटी 31 लाख रुपये इतका होता.
भाजपच्या एकूण खर्चापैकी 88 टक्के (3 हजार 774 कोटी 58 लाख रुपये) रक्कम केवळ निवडणूक कामांसाठी वापरण्यात आली आहे. यात जाहिरात आणि प्रसिद्धीवर सर्वाधिक 2 हजार 257 कोटी रुपये खर्च झाले. तसेच भाजपने इलेक्ट्रॉनिक मिडियावर 1 हजार 124 कोटी 96 लाख, विमान आणि हेलिकॉप्टर प्रवासावर 583 कोटी 8 लाख रुपये आणि उमेदवारांना आर्थिक मदत म्हणून 312 कोटी 90 लाख रुपये खर्च केले आहेत.
उत्पन्नातही झाली वाढ
सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्ड योजना बंद केल्यानंतरही भाजपला देणगी स्वरुपात मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. 2023-24 मध्ये भाजपच्या तिजोरीत 4 हजार 340 कोटी रुपये होते. 2024-25 मध्ये यात वाढ होऊन ही रक्कम 6 हजार 769 कोटी 14 लाखांवर पोहोचली. 31 मार्च 2025 पर्यंत भाजपच्या तिजोरीमध्ये 12 हजार 164 कोटी 14 लाख रुपये होते. भाजपच्या तुलनेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने 2024-25 मध्ये निवडणूक आणि प्रचारावर 896.22 कोटी रुपये खर्च केले.





























































