भाजपनं माजी मंत्र्याला वाजतगाजत घेतलं पक्षात, 6 तासात केली हकालपट्टी

पार्टी विथ डिफरेन्सची घोषणा करणारी भाजप सध्या इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात येन केन प्रकारे घेण्यासाठी आसूसलेली दिसते. मात्र हरियाणात अन्य पक्षातील नेत्याला आपल्या पक्षात घेण्याचा भाजपचा प्रयत्न फसला आहे. वाजत गाजत पक्षात प्रवेश घेतलेल्या माजी मंत्र्याला भाजपने अवघ्या 6 तासात हकलले.

दिल्लीचे माजी कॅबिनेट मंत्री संदीप कुमार यांना हरियाणा भाजपने मोठा गाजावाजा करत पक्षात सहभागी केलं होतं. त्यानंतर पक्षाच्या काही नेत्यांना त्यांचा वादग्रस्त भूतकाळ कळाला आणि अखेर त्यांनी संदीप कुमार यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

भाजप नेत्यांनी उलट आरोप केला की, कुमार यांनी जाणूनबुजून आपचे नेते आणि मंत्री म्हणून मागील कार्यकाळ लपविला. हरियाणा भाजपचे प्रभारी सुरेंद्र पुनिया यांनी X वर घोषणा केली, ‘संदीप कुमार यांना त्यांच्या भूतकाळातील काही तथ्य लपविल्याबद्दल पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित करण्यात आले आहे’.

अनेक वादात अडकलेल्या कुमार याला 31 ऑगस्ट 2016 रोजी दिल्ली मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले होते, कारण एक सीडी समोर आली होती ज्यामध्ये तो दोन महिलांसोबत काही तडजोड करताना दिसत आहेत. त्यानंतर 3 सप्टेंबर 2016 रोजी एका महिलेने त्यांच्यावर अश्लील सीडी बनवल्याचा आरोप केल्याने त्याला अटक करण्यात आली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांना त्यांच्या मंत्रिपदावरून हटवले होते.

पीडितेने दावा केला की रेशन कार्ड मिळवण्याच्या बहाण्याने तिचे शोषण केले गेले, तर कुमारने आरोप नाकारले होते आणि आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते.

भाजपमध्ये सहभागी होण्यापूर्वी कुमारने 2021 मध्ये ‘कीर्ती किसान शेरे पंजाब’ या राजकीय संघटनेची स्थापना केली. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या उपस्थितीत तो भाजपमध्ये सहभागी झालो परंतु त्यांचा वादग्रस्त भूतकाळ उघडकीस आल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं.

कुमार हा मूळचा सोनीपतमधील सरगथल गावचा आहे, त्याने 2004 मध्ये दिल्ली विद्यापीठातून पदवी संपादन केली आणि 2009 मध्ये चौधरी चरण सिंग विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली.