भाजपला नागपूरहून रिमोट कंट्रोलने देश चालवायचा आहे, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

श्रीनगर येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला. ‘आम्हाला वाटतं की प्रत्येक ठिकाणची संस्कृती त्यांचा इतिहास, भाषा यांचं रक्षण व्हावं. तुमचा आवाज तुमच्या सरकारमध्ये असली पाहिजे. जे तुम्हाला हवं आहे, जम्मू-कश्मीरच्या जनतेला हवं आहे. जे तुमच्या हृदयात आहे ते व्हावं. भाजपची विचारधारा वेगळी आहे. ते (भाजप) संपूर्ण देशाला नागपूरहून चालवू इच्छितात. रिमोट कंट्रोलने संपूर्ण देश चालवावा असं त्यांना वाटतं, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी श्रीनगर येथे बोलताना केला.

राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना विविधतेत एकतेचं महत्त्व समजावलं. प्रत्येक राज्यानं आपली संस्कृती, पद्धती जपावी, प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व मिळावं असा विचार मांडला. ‘तुमची जीवन जगण्याची, विचार करण्याची एक पद्धत आहे, ती वेगळी आहे. जम्मूची एक संस्कृती आहे, केरळची एक वेगळी संस्कृती आहे, कर्नाटक-उत्तर प्रदेश प्रत्येकाची एक वेगवेगळी संस्कृती आहे. आम्हाला वाटतं की प्रत्येक ठिकाणची संस्कृती त्यांचा इतिहास, भाषा यांचं रक्षण व्हावं. तुमचा आवाज तुमच्या सरकारमध्ये असली पाहिजे. भाजपची विचारधारा वेगळी आहे, असं ते म्हणाले.

सत्तेचं केंद्रीकरण करण्याची भाजपची विचारधारा आहे, तर आमची विचारधारा सत्तेच्या विकेंद्रीकरणाची आहे’, असं त्यांनी अधोरेखित केलं. ‘आम्ही इच्छितो की पंचायती राज असावं, मनरेगा असावं, पंचायत विधानसभेत तुमच्या हिताचे निर्णय व्हावेत. लोकसभेत तुमचा आवाज पोहोचावा हीच आमची इच्छा आहे. कधी कधी आमच्या पक्षात यावर विरोध होतो. कुणी म्हणतो मी तर महाराष्ट्राच्या हिताचं बोलणार, त्यावेळी आम्ही त्याला बोला, तुमचं मत मांडा, योग्य असेल तर मॅनेज करू. अनेकदा असं म्हणतात की काँग्रेसमध्ये विविध विचारधारा आहेत, हो तसं आहे. आमचं मत आहे की देशाच्या विविध भागातील आवाज, विविध भाषा, जाती सगळ्यांचे आवाज आमच्यापर्यंत पोहोचावा. आम्हाला तुमच्या हृदयाचा आवाज ऐकायचा आहे’, असंही राहुल गांधी म्हणाले.

जम्मू-कश्मीर माता वैष्णो देवीची भूमी!

श्रीनगरमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी तिथल्या संस्कृती, जीवनपद्धती, इतिहासाचा उल्लेख केला. ‘जम्मू कश्मीरला एक इतिहास आहे. ही माता वैष्णो देवीची भूमी आहे’, असंही ते म्हणाले.