मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यामुळे केंद्राने याबाबतीत पुढाकार घ्यावा. हा विषय राष्ट्रपतींकडे न्यावा, शिवसेना सर्वात आधी पाठिंबा देईल.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणूक एकजुटीने लढणार आणि जिंकणार, असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच आम्ही भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा वज्रनिर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना निवडणुकीसाठीची शिवसेनेची भूमिका मांडली.
लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीला देशात प्रचंड यश मिळाल्यामुळे आगामी विधानसभा निवणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीमध्येही महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळेल आणि सत्तापरिवर्तन होईल असे स्पष्ट संकेत सध्या राज्यात दिसत आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला असून उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
उपराष्ट्रपतींची भेट घेणार
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची उद्धव ठाकरे सदिच्छा भेट घेणार आहेत. धनखड यांचे शिवसेनाप्रमुखांपासूनचे आमचे वैयक्तिक संबंध आहेत. त्या अनुषंगाने भेट होऊ शकते, असेही त्यांनी स्ष्ट केले.
शिवसेना खासदारांची बैठक
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सर्वच खासदारांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी खासदारांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या बैठकीला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय ऊर्फ बंडू जाधव, संजय दीना पाटील, राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर हे उपस्थित होते.
आज राष्ट्रीय मीडियाशी संवाद
उद्धव ठाकरे यांच्या तीन आठवडय़ांच्या दिल्ली दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी 7 ऑगस्टला ते राष्ट्रीय मीडियाशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते कोणती राजकीय भूमिका मांडतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत बहुमत आणायचेय! -संजय राऊत
उद्धव ठाकरे यांचे दिल्लीत आगमन झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेसचे रमेश चेन्नीथला व राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही दिल्लीत आहेत. त्यामुळे आम्ही एकत्र बसणार म्हणजे आम्ही महाराष्ट्राविषयीच चर्चा करणार. लोकसभा निवडणूक आम्ही जिंकली आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला बहुमत आणायचे आहे.’
अवघ्या देशाचे लक्ष
लोकसभा निडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा केला होता. यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. आता उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते ‘इंडिया’ आघाडीच्या बडय़ा नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. यामध्ये ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणती व्यूहरचना आखतात, जागावाटपाबाबत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण देशाच्या राजकीय विश्वाचे लक्ष लागले आहे.
‘इंडिया’च्या नेत्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा
उद्धव ठाकरे दिल्लीत येताच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीच्या अनेक बडय़ा नेत्यांशी उद्धव ठाकरे तीन दिवसीय दौऱ्यात चर्चा करणार आहेत.
कुठे मध्य प्रदेशचे शिवराजमामा आणि कुठे हे आमच्याकडचे तीन मामू
मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान यांनी मुख्यमंत्री असताना राबविलेली ‘लाडली बहना’ योजना कॉपी करून सध्या महाराष्ट्रात राबविली जात आहे. ही योजना गेमचेंजर ठरेल काय असे विचारले असता, ही योजना राबविणारे शिवराजसिंग चौहान हे तिकडचे अत्यंत लोकप्रिय नेते होते. त्यांना जनता प्रेमाने मामा म्हणते. कुठे ते मामा आणि कुठे हे आमच्याकडचे तीन मामू, असा टोलाही हाणत ही योजना राबवली म्हणजे तुमचे पाप झाकणारे नाही, असा खरमरीत टोलाही त्यांनी शिंदे-फडणवीस व अजित पवारांना उद्देशून लगावला. ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी भगिनींना केले.
मतदान पंधराशे रुपयांसाठी की पंधरा लाखांसाठी
‘लाडकी बहीण योजने’त तरतूद केलेली पंधराशे रुपयांची रक्कम पुरेशी नाही. भाजपाने जनतेला पंधरा लाख रुपये खात्यात जमा करू म्हणून मते मागितली होती. मग मतदान पंधराशेसाठी करणार की पंधरा लाखांसाठी, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मंगळवारी दिल्ली विमानतळावर सहकुटुंब आगमन झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. रश्मी ठाकरे व युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांचे विमानतळावर आगमन होताच शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे व कुटुंबीयांचे स्वागत केले. यावेळी आमदार अनिल परब हेही उपस्थित होते.