
सीमाभागात मराठी भाषिकांचा कर्नाटक सरकार विरोधातील दरवर्षीप्रमाणे होणारा ‘काळा दिन’ दडपण्याचा प्रयत्न यंदाही कर्नाटक सरकारने केला असला तरी, या बंदीची पर्वा न करता, मूक सायकल फेरी काढण्यासाठी सीमाबांधव तितक्याच ताकदीने सज्ज आहेत.
भाषावार प्रांतरचनेत कर्नाटकमध्ये बेळगावसह सीमा भाग जबरदस्तीने घुसडल्याच्या निषेधार्थ कर्नाटक राज्य स्थापनेदिवशी 1 नोव्हेंबर रोजी सीमाभागात मराठी भाषिक ‘काळा दिन’ पाळतात. बंदी झुगारत काळ्या फिती बांधून तसेच काळी वस्त्रे परिधान करून, मूक सायकल फेरी काढली जाते.
शिवसेना पदाधिकाऱ्यांना बेळगाव बंदी
शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शांतता-सुव्यवस्था बिघडू नये याचे कारण पुढे करत, संपूर्ण दिवस बेळगाव जिह्यात प्रवेशबंदी आदेश जारी केला आहे. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनाही नोटिसा बजावल्या आहेत.
































































