
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत ठाण्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार समोर येत आहेत. यामध्ये काही टोळ्या सक्रिय झाल्या असून 1800 रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅसचा बाटला काळाबाजारात चार ते पाच हजाराला विक्री केला जात असल्याचा आरोप हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे. त्यामुळे सरकारने मेस्मा लागू करूनही मोठ्या प्रमाणात सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, गॅसचा पुरवठा कमी झाल्याने रविवारपर्यंत शहरातील 80 टक्के हॉटेल बंद राहणार असल्याचे हॉटेल मालकांनी आज सांगितले.
ठाणे हॉटेल असोसिएशन या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या व्यथा मांडल्या. एक महिना पुरेल इतका गॅस उपलब्ध असल्याचे सांगितले असले तरी काळाबाजारात दुप्पट पैसे घेऊन गॅसची विक्री केली जात आहे. दरम्यान, काळाबाजारातील विक्रीवर सरकारने नियंत्रण आणले नाही तर रविवारपर्यंत ठाण्यातील 80 टक्के हॉटेल बंद पडतील अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी ठाणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष उमेश शेट्टी, उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी, सेक्रेटरी रघुनाथ रॉय, खजिनदार प्रशांत शेट्टी उपस्थित होते.
ठाणे महापालिकेच्या एका तत्कालीन मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याने हॉटेल व्यावसायिकांना पाइप लाइनने गॅस पुरवठा करण्यास विरोध केला होता त्याची शिक्षा आता मिळत आहे. दरम्यान, विद्यमान मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांनी 30 टक्के हॉटेल व्यावसायिकांना पाइपलाइन गॅस पुरवठा करण्यासाठी परवानगी दिली त्यामुळे 30 फक्त हॉटेल तरी सुरू राहतील.
रत्नाकर शेट्टी (उपाध्यक्ष हॉटेल असोसिएशन)




























































