स्वातंत्र्यदिनी 300 ठाणेकरांच्या घरात ‘ब्लॅक आऊट’, हाजुरीतील महावितरणचा डीपी पेटला; पाच तास वीज गायब

हाजुरीतील महावितरणचा डीपी पेटल्याने ऐन स्वातंत्र्यदिनी 300 ठाणेकरांच्या घरात ‘ब्लॅकआऊट’ झाला होता. ही आग जरी किरकोळ असली तरी या आगीमुळे डीपीचे मोठे नुकसान झाले. डीपीतील वायर्स जाळून खाक झाल्याने तब्बल पाच तास वीज गायब झाली होती. विजेच्या खेळखंडोबामुळे नागरिक हैराण झाले होते.

वागळे इस्टेटमधील हाजुरी दर्गा परिसरात असलेल्या डीपीला आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत डीपीचे नुकसान होऊन त्यातील केबल व कनेक्टर जळून खाक झाले. त्यामुळे आसपासच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. या आगीची माहिती मिळताच महावितरण कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अवघ्या वीस मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पाच तास शर्थीचे प्रयत्न करून वीजपुरवठा सुरू केला. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.