
कर्जत यार्डच्या पुनर्रचना कामासाठी मध्य रेल्वेवर शनिवारपासून मंगळवारपर्यंत विशेष ट्रफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात नेरळ ते कर्जत आणि कर्जत ते खोपोली दरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे. याचा मध्य रेल्वेच्या संपूर्ण प्रवाशी सेवेवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. तसेच रविवारी पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरही ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. अनेक मेल-एक्सप्रेसचे वेळापत्रक कोलमडणार आहे. शनिवारी दुपारी 12.20 ते रविवारी सायंकाळी 6.20 वाजेपर्यंत, सोमवारी सकाळी 11.20 ते दुपारी 2.20 वाजेपर्यंत आणि मंगळवारी सकाळी 11.20 ते 14.20 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
बोरिवली–राम मंदिर दरम्यान चार तासांचा जम्बो ब्लॉक
बोरिवली ते राम मंदिर आणि राम मंदिर ते कांदिवली स्थानकांच्या दरम्यान पाचव्या मार्गिकेवर सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक काळात सर्व अप जलद मार्गावरील गाड्या बोरिवली आणि अंधेरी स्थानकांच्या दरम्यान अप धिम्या मार्गावर चालवल्या जातील.