मुंबईत पावसाळी आजारांना आळा घालण्यासाठी संपूर्ण पालिका प्रशासन सज्ज झाले असून आरोग्य विभाग आणि कीटकनाशक विभागाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. यामध्ये कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या ‘ट्रकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट’ अशा पद्धतीप्रमाणे डेंग्यू, मलेरियासारखे पावसाळी आजार रोखण्यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधणे, घराघरात सर्वेक्षण, तपासण्या करून रुग्णांचा शोध घेणे आणि औषधोपचार करण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, दिल्लीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ‘फोकाय’ पद्धत वापरली जाणार आहे. याबाबत पालिकेकडून आज पावसाळी तयारीची सविस्तर माहिती देण्यात आली.
जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली) व मुंबई महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या कार्यशाळेत हिवताप, डेंग्यू आणि जलजन्य आजार यांचे प्रतिबंधक नियंत्रण व उपाययोजना याबाबत विशेष लक्ष केंद्रीत अर्थात ‘फोकाय’ आधारित उपचार आणि सूक्ष्म आराखडा याबाबत विशेष भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी एखाद्या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत अशा ठिकाणी लक्ष पेंद्रित करतानाच अधिकाधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना त्या विशिष्ट विभागात राबविण्याचे उद्दिष्ट या पद्धतीनुसार ठेवण्यात येते. डासांची उत्पत्तीस्थाने शोधणे, डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे अशा उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतात. तसेच डेंग्यू आणि हिवताप रुग्णांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करणे अपेक्षित आहे.
म्हणूनच वाढले रुग्ण
गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता 2021 आणि 2022 च्या तुलनेत सन 2023 मध्ये रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ आढळून येण्याचे प्रमुख कारण म्हणजे 2023 मध्ये महानगरपालिकेने रुग्णसंख्या नोंद घेण्याची व्याप्ती मोठय़ा प्रमाणावर वाढवली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. पूर्वीच्या 22 वरून थेट 880 वैद्यकीय संस्थांकडून या आजारांच्या रुग्णसंख्येची नोंद होऊ लागली.
अशा आहेत उपाययोजना
यंदा जागतिक हिवताप निर्मूलन दिनानिमित्त नायर दंत रुग्णालय येथे पालिकेचा आरोग्य विभाग, आरोग्य विद्यापीठाचा संशोधन विभाग आयोजित प्रशिक्षण परिसंवादात साधारण 85 भारतीय वैद्यकीय संघटना पदाधिकारी, खासगी डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
हिवताप, डेंगी आणि जलजन्य आजार यांचे प्रतिबंधात्मक नियंत्रण व उपाययोजना याबाबत केईएम रुग्णालयात 18 तुकडय़ांमध्ये अद्ययावत प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणाला 482 वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी हजर होते.