महिन्याच्या 1 तारीखला होणारा पगार दुसऱ्या दिवशीही झाला नसल्याने पालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांना आज अक्षरशः घाम फुटला. कर्मचाऱ्यांनी बँकांसह प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अखेर पगार होणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कामात तांत्रिक बिघाड झाल्याने पगार रखडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अखेर आज 2 तारीखला दुपारनंतर कर्मचाऱ्यांचे पगार टप्प्याटप्प्याने खात्यावर जमा झाल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मुंबई महानगरपालिकेचे सुमारे 90 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी व अधिकारी आहेत. या कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 1 तारीखला होतो, मात्र यावेळी जुलै महिन्याचा पगार 2 ऑगस्ट उजाडला तरी खात्यावर जमा झाला नसल्याने कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढले. महिन्याच्या 1 तारीखला पगार होतो म्हणून अनेक कर्मचाऱ्यांच्या घराचा हप्ते 1 तारीखचेच आहेत, तर सोसायटी मेंटेनन्स, शाळांच्या ‘फी’चा चेकही 1 तारखेचा दिला जातो. मात्र सुमारे 80 टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार 1 ऑगस्टला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा झालाच नाही. त्यामुळे घराचे हप्ते गेले नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. चेक थकल्यामुळे त्याचा सिबिलवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अखेर 2 तारीखला दुपारनंतर कर्मचाऱ्यांचे पगार व्हायला सुरुवात झाली, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आले.
दरम्यान, आता तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असून 2 ऑगस्ट दुपारपासून सर्व कर्मचाऱ्यांचे पगार जमा होऊ लागले असल्याची माहिती पालिकेच्या लेखा विभागाकडून देण्यात आली.