पालिकेची उद्याने आता रोज 12 तास खुली राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

पालिकेची उद्याने यापुढे दिवसातून 12 तास खुली राहणार आहेत. सकाळी 6 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 9 दरम्यान उद्याने खुली ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेने सुशोभित केलेल्या उद्यानांचा नागरिकांना लाभ घेता यावा म्हणून उद्याने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पालिकेने गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत मोठय़ा प्रमाणावर नवीन उद्याने बांधली असून अनेक उद्यानांचा कायापालट केला आहे, मात्र उद्याने खुल्या राहण्याच्या वेळा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळय़ा असल्याने नागरिकांची अनेकदा गैरसोय होते. काही ठिकाणी उद्याने सकाळी 11 वाजता तर सायंकाळी 7 वाजताच बंद होतात. त्यामुळे कामावरून उशिरा घरी परतणाऱ्या मुंबईकरांना या उद्यानांचा म्हणावा तसा उपयोग होत नव्हता. या सर्व बाबी लक्षात घेऊन ही उद्याने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवावीत अशी मागणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन नुकतीच केली होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनी हे निर्देश दिले आहेत.

तसेच उद्यानांमध्ये आवश्यक असणारे दैनंदिन परिरक्षण हे दुपारी 12 ते 3 या कालावधीत प्राधान्याने करण्याचे आदेशही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहेत. त्याचबरोबर महापालिका उद्यानांच्या प्रवेशद्वारांवर सुधारित वेळांचे फलक तातडीने लावण्याच्या सूचनाही देण्यात येत आहेत, अशी माहिती पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

साडेसातशे उद्याने

महापालिकेची संपूर्ण मुंबईत तब्बल 750 उद्याने आहेत. उद्यानांच्या विकासासाठी पालिकेचा खास ‘गार्डन सेल’ विभाग असून त्याद्वारे नागरिकांना उद्यान व खेळाच्या मैदानांची सुविधा देण्याचे नियोजन व व्यवस्थापन केले जाते. रविवार असो किंवा सार्वजनिक सुट्टी असो पालिकेची उद्याने खुली असतात. या उद्यानांच्या खुल्या राहण्याच्या वेळा आतापर्यंत वेगवेगळय़ा होत्या. त्यात आता सुसूत्रता येणार आहे.