
शिवडी क्षयरोग रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांची कमतरता, योग्य उपचार न मिळणे, रुग्णालयाच्या इमारतीत असलेल्या विविध प्रकारच्या गैरसोयी यामुळे गेल्या 8 वर्षांत रुग्णालयातून तब्बल 400 रुग्ण फरार झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे सरकारच्या क्षयरोग निर्मूलन मोहिमेचे तीनतेरा वाजले. याबाबत असंख्य तक्रारी आल्यानंतर अखेर मुंबई महापालिकेला जाग आली असून शिवडी क्षयरोग रुग्णालयातील स्थिती सुधारण्यासाठी 50 बहुउद्देशीय कामगारांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सेंटर ऑफ एक्सलन्सच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. सध्या दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरू येथेच सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणता येईल अशी अद्ययावत क्षयरोग रुग्णालये आहेत. मुंबईतील शिवडी क्षयरोग रुग्णालयातही उत्तम सुविधा मिळावी, महागडे उपचार घेण्यासाठी खासगी रुग्णालयात जावे लागू नये अशी रुग्णांची अपेक्षा आहे. परंतु, परिस्थिती उलट असल्याने रुग्णालयातून रुग्ण फरार होण्याचे प्रमाण वाढले होते. याप्रकरणी आमदार श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिले होते. रुग्णालयात सर्व सोयीसुविधा पुरवण्यात येतील. तसेच याबाबत तज्ञ समितीची नेमणूक करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार एका नोंदणीपृत एनजीओच्या माध्यमातून 50 बहुउद्देशीय कामगारांची भरती करण्यात येणार आहे.
साडेतीन वर्षांत 3 हजार 185 रुग्णांचा मृत्यू
साडेतीन वर्षांत तब्बल 3 हजार 185 रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू झाला आहे. त्यात पुरुषांची संख्या 2 हजार 126 तर एक हजार 59 महिलांचा समावेश आहे. 2021 मध्ये 974 जणांचा मृत्यू झाला होता, तर 2022 मध्ये 959 रुग्णांचा मृत्यू झाला. 2023 मध्ये 855 रुग्णांचा आणि मे 2024 पर्यंत 397 जणांचा क्षयरोगाने मृत्यू झाला.