खड्ड्याची तक्रार व्हॉट्सऍपवर करा, महापालिका 24 तासांत बुजवणार

पावसाळ्यात कुठल्याही ठिकाणी दिसणाऱया खड्डय़ाचा फोटो पालिकेला पाठवल्यास 24 तासांत हा खड्डा बुजवण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेने सर्व 25 वॉर्डसाठी संबंधित अधिकाऱयांच्या नावांसह व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे तक्रार आल्यानंतर निर्धारित वेळात खड्डा बुजवण्याचे काम पूर्ण झाले नाही तर संबंधित रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असणाऱया कंत्राटदाराला दंड करण्यात येणार असून ही रक्कम त्याला देय असणाऱया रकमेतून कापली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे उरकण्यासाठी प्रचंड धावपळ सुरू आहे. नालेसफाई करूनदेखील गाळ, कचरा साचलेल्या नाल्यांची नव्याने सफाई करण्यात येत आहे. यामध्ये पालिकेला पावसाळय़ात सर्वाधिक टीकेचा सामना कराव्या लागणाऱया खड्डय़ांचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिका अत्याधुनिक तंत्रज्ञानाने खड्डे बुजवणार आहे. मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते आहे. काही ठिकाणी वाहतूककोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागते अशा वाहनचालक, नागरिकांना तक्रार करण्यासाठी अभियंत्यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध केले आहेत.
मागील काही वर्षांतील खड्डे
2020 – 65 हजार 617
2021 – 43 हजार 478
2022 – 38 हजार 310
2023 – 71 हजार 773
(सप्टेंबरपर्यंत)

तीन तासांत वाहतूक सुरू
पावसाळय़ात पडणारे खड्डे बुजवण्यासाठी पालिका यावर्षी मायक्रोसर्फेसिंग आणि जिओ पॉलिमर तंत्रज्ञानाने खड्डे बुजवण्यात येणार आहेत. यामध्ये मायक्रोसर्फेसिंगसाठी लागणारे मिश्रण वसई, भिवंडी, नवी मुंबई, ठाणे येथून आणले जाईल. यासाठी प्रत्येक प्रभागात दोन मोठे तर एक लहान वाहनाची व्यवस्था असेल.
तर जिओ पॉलिमर तंत्रज्ञानाने जागीच मिश्रण तयार करून खड्डा बुजवला जाणार आहे. या दोन्ही तंत्रज्ञानाने दोन ते तीन तासांत संबंधित रस्त्यावरून वाहतूक सुरू करता येणार आहे. पावसाळा तोंडावर आल्यामुळे सद्यस्थितीत रात्रंदिवस खड्डे बुजवणे, रस्त्यांच्या डागडुजीचे काम सुरू आहे.