Mumbai News – मानखुर्दमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

मानखुर्दमध्ये अज्ञात महिलेचा अर्धवट कुजलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधारण तीन ते चार दिवसांपूर्वी महिलेची हत्या करून मृतदेह टाकण्यात आला आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा संयुक्त तपास करत आहेत.

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये मेट्रो बी मार्गावर कारशेडचे बांधकाम सुरू आहे. यामुळे येथे बांधकामासाठी काही उत्खनन केल्याने मातीचे ढिगारे तयार झाले आहेत. या ढिगाऱ्यातून शुक्रवारी सकाळी दुर्गंधी येत होती. कामगारांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. यानंतर वरिष्ठांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता प्लास्टिकच्या पिशवीतून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले.

कामगारांनी प्लास्टिक पिशवी उघडून पाहिली असता आत महिलेचा मृतदेह आढळला. यानंतर तात्काळ ट्रॉम्बे पोलिसांना माहिती देण्यात आली. ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. अज्ञातांविरोधात हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने सलवार कमीज आणि इमिटेशन ज्वेलरी परिधान केली आहे. महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटवणे कठीण झाले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे तपास सुरू केला आहे.