बोगस एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव, भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या अडचणीत वाढ

साताऱ्यातील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बोगस एफआयआर दाखल करण्यासाठी गोरेंनी वडूज पोलिसांवर दबाव टाकला. त्यांच्या दबावामुळे पोलिसांनी अधिकारक्षेत्र नसताना गुन्हा नोंदवला, असा आरोप करणारी नवीन याचिका दाखल झाली आहे. याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. याआधी कोविड उपचार घोटाळ्याप्रकरणी जयकुमार गोरेंच्या सहभागाचा आरोप करणारी याचिका दाखल झालेली आहे.

कर्नाटकच्या निपाणी येथील धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग महादेव देशमुख यांनी ऍड. वैभव गायकवाड यांच्यामार्फत फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. कोणतीही वैध कागदपत्रे व अधिकारक्षेत्र नसताना वडूज पोलिसांनी आपल्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि अटक केली. भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या दबावातूनच पोलिसांनी ही कारवाई केली, असा आरोप संजोग देशमुख यांनी केला आहे. तसेच सातारा पोलीस अधीक्षक, दहिवाडी कॅम्प वडूजचे पोलीस उपअधीक्षक, वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली. याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. याचिकेत गंभीर आरोप केल्यामुळे गोरेंबरोबरच सातारा पोलिसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वडूज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करताना सतीश पाटील यांच्यासोबत जयकुमार गोरे होते. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोरे तेथे हजर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, याकडेही संजोग देशमुख यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.

जयकुमार गोरेंचे कनेक्शन

सतीश पाटील यांनी संस्था हडप करण्यासाठी जयकुमार गोरेंच्या दबावतंत्राचा वापर केला. इतकेच नव्हे तर पाटील यांनी अधिकार नसतानाही 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर गोरे यांना वैद्यकीय संस्था विकली. याच कनेक्शनमुळे दोघांनी खोटा गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला. गोरेंच्या दबावातून कॉलेजचे बँक खाते गोठवण्यात आले, असे याचिकेत म्हटले आहे.

याचिकेत काय म्हटलेय? 

धारवाड येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या नियंत्रणावरून दोन गटांत वाद सुरू आहे. सतीश पाटील यांनी निपाणी येथील दिवाणी न्यायालयात दावा केला होता. त्यांनी 2018-19 मध्ये सोसायटीचे आपणच अध्यक्ष असल्याचा दावा करीत फेरफार केलेली कागदपत्रे धारवाडच्या सोसायटी निबंधकांकडे सादर केली होती.

याप्रकरणी सोसायटीच्या एका सदस्याने तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी त्याआधारे पाटील यांच्याविरुद्ध कारवाई केली नाही. याचदरम्यान सोसायटी निबंधकांनी कर्नाटक नोंदणी कायद्याच्या कलम 13 अन्वये नवीन व्यवस्थापन समितीचा स्वीकार केला. त्यानंतर 28 मे 2023 रोजी पाटील यांनी स्वतःच सोसायटीचा अध्यक्ष असल्याचा दावा करीत वडूज पोलिसांत तक्रार नोंदवली.

सतीश पाटील यांनी केलेल्या आरोपांचा विचार करता याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास करणे हे वडूज पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. असे असताना आमदार गोरेंच्या दबावातून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि 29 मे 2024 रोजी संजोग देशमुख यांना अटक केली.