
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच सुटका केली. पीडित अल्पवयीन आहे की नाही, हे दर्शवणारा कोणताही पुरावा तपास यंत्रणेकडे नव्हता, किंबहुना शाळा सोडल्याच्या दाखल्यावर विसंबून न राहता पोलिसांनी पीडितेचे वय निश्चित करण्यासाठी तिच्या हाडांची चाचणी (ऑसिफिकेशन टेस्ट) करून घेणे आवश्यक होते, असे निरीक्षणही निकालात नोंदवले.
पीडित मुलगी व आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. पीडितेने दिलेल्या जबाबानुसार बहिणीची ओळख करून देतो असे सांगत आरोपी तिला घरी घेऊन गेला. तेथे तिच्यावर त्याने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भा.दं.वि. कलम 363, 366, 376 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 4, 8 व 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 10 ऑगस्ट 2022 रोजी आरोपीला अटक करण्यात आली असून याप्रकरणी दोषरोप पत्रही पोलिसांनी दाखल केले आहे. शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला, त्यावर न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. पीडितेच्या विधानावरून ती स्वतः आरोपीच्या घरी जाऊन राहिली होती असे दिसते. त्यामुळे हे प्रकरण प्रेमसंबंधाचे असण्याची दाट शक्यता व्यक्त करत न्यायालय म्हणाले की, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचा कोणताही ठोस पुरावा तपास यंत्रणेकडे नाही. तसेच आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही व पळून जाण्याची शक्यता नाही, असे नमूद करत न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीची सुटका केली.





























































