
महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या राडा प्रकरणानंतर फरार झालेले शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आज तब्बल दीड महिन्यानंतर महाड पोलिसांना शरण आले. मुंबई उच्च न्यायालयाने विकास गोगावले फरारप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री भरत गोगावले यांच्यासह पोलिसांवर सणसणीत ताशेरे ओढले. मुलगा फरार असताना भरत गोगावले अजून मंत्रीपदावर कसे असे तडाखे लगावतानाच, विकास गोगावले यांना सकाळी 11 वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याचे सज्जड आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर वडिलांचे मंत्रीपद वाचवण्यासाठी विकास गोगावले पोलिसांपुढे सरेंडर झाले.
महाड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिंदे गट आणि अजित पवार गटात तुफान राडा झाला. या निवडणुकीत बेदम मारहाण करतानाच गाडय़ांवर तुफान दगडफेक करण्यात आली होती. यावेळी रिव्हॉल्व्हर रोखल्याचा आरोपही करण्यात आला होता. या राडय़ानंतर महाड पोलिसांनी विकास गोगावले यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले होते. भरत गोगावले यांचा पुतण्या महेश गोगावले यांच्यासह इतर सात ते आठ जण आणि अजित पवार गटाचे हनुमंत जगताप, श्रेयस जगताप, सुशांत जबरे, धनंजय देशमुख यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यापासून विकास गोगावले अटकेच्या भीतीने फरार झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी केली होती, मात्र विकास गोगावले सापडले नव्हते.
माणगाव सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळले
या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी विकास गोगावले यांच्यासह सर्वांनी माणगाव सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र माणगाव सत्र न्यायालयाने या सर्वांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले होते. मात्र त्यानंतरही गोगावले यांच्यासह सर्व आरोपी पोलिसांसमोर हजर झाले नाहीत. त्यांनी उच्च न्यायालयात जामीन मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केला होता.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान शरण आलेल्या आरोपींना प्रथम वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना महाड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील पुढील तपासाची दिशा आणि आरोपींची भूमिका तसेच घटनेमागील नेमकी कारणे याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आम्ही करत असून सर्व बाबी तपासून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, विकास गोगावले यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र गुरुवारी न्यायालयाने यावर सुनावणी घेताना मुख्यमंत्री, सरकार आणि मंत्र्यांना अक्षरशः धारेवर धरले होते.
भरत गोगावलेंशी विकासचा रोजचा संपर्क
फरार झालेले विकास गोगावले पोलिसांना सापडत नसले तरी ते दररोज मंत्री भरत गोगावले यांच्या संपर्कात होते. तशी कबुलीही भरत गोगावले यांनी माध्यमांसमोर दिली होती. मात्र हे आरोपी दीड महिना उलटून गेला तरी पोलिसांना सापडत नसल्याने हा तपासच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

































































