
लता गुठे लिखित हा ‘सोलमेट’ हा कथासंग्रह आपल्या विचारांचे प्रतिबिंब वाटावे असा आहे. प्रत्येक कथेचा विषय आशय वेगळा परंतु प्रत्येक कथा प्रेम या विषयाला वाहिलेली आहे. खऱ्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे ‘सोलमेट’ असे या सर्व कथांचे सार या शीर्षकात दडल्यासारख हा कथासंग्रह आहे. या सर्वच कथा नितांत सुंदर, दर्जेदार व आकर्षक आहेत.
या प्रत्येक कथेची जातकुळी वेगळी आहे. या विज्ञानकथा, गूढकथांमधून लेखिकेने उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या अवतीभवती दिसतात. आयुष्यात कितीही वादळं आली तरी न डगमगता जीवनाला सामोरे जाण्राया. नायिका एका पाठोपाठ एक कथेतून जिवंत होऊन समोर साकार होतात. तरुण मनात फुललेला प्रेमाच अंकुर त्यांच्या मनाची उलघाल, अस्वस्थता ‘एका चुकीची सजा’ य कथेत दर्शवली आहे. या कथेची घट्ट वीण, बोली भाषेतील संवाद आणि ग्रामीण भागातील झालेली जडणघडण यामुळे ही कथा वेगळेपण अधोरेखित करते.
या संग्रहातील अनेक कथांमधून व्यक्त होणारे सामाजिक प्रश्न मनाला भिडणारे आहेत. रोजच्या जगण्यातील संघर्ष, जीवनातील वैफल्य, त्यावर केलेली मात, प्रेमाची मिळणारी साथ त्यातील सकारात्मक ऊर्जा यातून कथा उलगडत जातात.
कथासंग्रहात समाविष्ट असलेल्या अठराही कथांमध्ये प्रेमाचे वेगळे जग दिसते. ‘वादळवाट’ कथेतून नियती आपल्याला कोणत्या वळणावर घेऊन जाईल याचा अंदाज येत नाही. वेगळ्या विषयाची कथा म्हणजे ‘एग्ज फ्रीजिंग’ जी आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जाते. तसेच ‘कोणीतरी आहे तिथं’ आणि ‘मास्तरांची सावली’ ह्या गूढकथा वाचताना अकल्पित थरारक अनुभव येतो. ‘अशी ही एक चेटकीण’ ही विज्ञान कथेच्या अंगाने जाणारी कथा. एक तरुणी फेसबुकच्या माध्यमातून अनेक मुलांना फसविते त्यांच्याशी लग्नाचा खेळ खेळते आणि त्यांना लुटून फरार होते.
प्रेम या विषयावर आधारित काही कथा फार भावतात. ‘मनमोहिनी राधा’ ही कथा वाचताना राधेचे कृष्णावर आणि कृष्णाचे राधेवर असलेलं प्रेम मंदिरात पूजले जाण्याइतके ते श्रेष्ठ ठरावे, असे वाटते. इतकी ही कथा जमून आलेली आहे. संग्रह वाचताना लेखिकेचे समृद्ध अनुभवविश्व आपल्यासमोर उलगडते. सर्वच कथा नितांत सुंदर, दर्जेदार व आकर्षक आहेत.