>> नवनाथ शिंदे
मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे टीमवर्क कामी आले आहे. तांत्रिक विश्लेषण, खबऱ्यांची माहिती, सराईतांची उचलबांगडी, हॉटेल-ढाबे, पानटपरीचालकांकडील चौकशीद्वारे गुन्ह्यातील आरोपींना बेड्या ठोकल्या.
गंभीर गुन्ह्यांची उकल केल्यानंतर स्थानिक पोलीस किंवा गुन्हे शाखेच्या विविध पथकांत बऱ्याचदा श्रेयवादाची लढाईही होते. मात्र, बोपदेव घाटातील सामूहिक अत्याचार प्रकरणात गुन्हे शाखेने दाखविलेले टीमवर्क कौतुकास्पद असल्याचे दिसून आले आहे. गुन्हा केल्यानंतर सराईत आरोपींनी पुराव्याचा मागमूस पोलिसांना लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली होती. तांत्रिक विश्लेषणात आढळून यायचे नाही, यासाठी मोबाइल फ्लाईट मोडवर ठेवले. सीसीटीव्हीत दिसून न येण्यासाठी पायवाटेचा मार्ग अवलंबिला होता. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी रात्रंदिवस कामाला प्राधान्य दिले होते.
पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील तब्बल ३ हजार मोबाईल संवादाचा डेटा संकलित केला. प्रामुख्याने जामिनावर कारागृहाबाहेर आलेले गुन्हेगार, कोंढवा परिसरात सातत्याने गुन्हेगारी करणाऱ्या सराईतांची उचलबांगडी, घाटापासून ८० ते 100 किलोमीटर अंतरापर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासणीसाठी पोलिसांनी डोळ्यात तेल ओतून काम केले. मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिघेही आरोपी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून पायवाटेने डोंगरातून पसार झाले होते. त्यामुळे शोधकार्यात अडथळा येत होता.
अखेरीस सासवड येथील आमराई वस्ती परिसरातील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही चित्रीकरणात संशयित आरोपी अस्पष्टपणे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील चित्रीकरण तपासले असता, एका मद्यविक्री दुकानात पाचजण दारू पीत असल्याचे आढळून आले. त्यांच्यापैकी असलेल्या एका सराईताला युनिट पाचच्या अमलदाराने ओळखले. त्यानंतर दोघा अमलदारांनी कोंढवा परिसरात जाऊन त्याच्याकडून माहिती घेतली. त्यावेळी त्याने सोबत मद्यपान केलेल्या आरोपींची माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखेला महत्त्वाचा पुरावा हाती लागला. पुन्हा एकदा पथकाने तांत्रिक तपास केला असता, आरोपीचा वावर बोपदेव घाटात असल्याचे स्पष्ट झाले. खक्ऱ्याची माहिती आणि रेखाचित्र तंतोतंत जुळल्याने पहिला आरोपी कनोजिया पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याच्या माहितीनुसार सराईत अख्तर शेखला पथकाने उत्तर प्रदेशातून बेड्या ठोकल्या आहेत.
टीमवर्क अन वरिष्ठांसोबतचे रिपोर्टिंग
संवेदनशील गुन्हा असल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली होती. जोपर्यंत आरोपींचा मागमूस लागत नाही, तोपर्यंत पोलीस अमलदार ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाच्या गोपनीयतेचे तंतोतंत पालन केले. छोट्या- मोठ्या क्लूबाबत वरिष्ठांना रिपोर्टिंग करणे, सत्यता पडताळून पाहण्यास प्राधान्य दिले. मिळालेली माहितीच्या अनुषंगाने पोलीस अमलदार रात्री-अपरात्री अगदी मध्यरात्रीच्या सुमारासही वरिष्ठांना फोन करीत होते. विविध पथकांनी दाखविलेल्या टीमवर्कमुळे सराईत आरोपीचाही पर्दाफाश केला.