बोरघाट दोन तास ठप्प, बॅटरी हिलजवळ उलटला, प्रचंड वाहतूककोंडी

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

खंडाळ्याहून मुंबईच्या दिशेने स्टीलचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना बोरघाटात आज सकाळी घडली. ब्रेक निकामी झाल्याचे समजताच ट्रकचालकाने वेळीच बाहेर उडी मारल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातानंतर बोरघाटात दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.

स्टीलचे साहित्य घेऊन ट्रकचालक खंडाळ्याहून मुंबईच्या दिशेने निघाला. हा ट्रक बोरघाटातील बॅटरी हिलजवळ पोहोचला असता अचानक ब्रेक निकामी झाले. ताबा सुटलेला ट्रक विरुद्ध दिशेला गेला आणि रस्त्याच्या मध्येच आडवा झाला. त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यातच बेशिस्त दुचाकी चालकांनी गाड्या कशाही घुसवल्याने वाहतूककोंडीत आणखी भर पडली. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी मुंबई लेनवर वाहने आडवी तिडवी टाकून महामार्ग ठप्प केला. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, अपघातग्रस्त टिम आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. मात्र तोपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल 2 तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.