>> राजेश चुरी
मुंबईला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्याचा सागरी मार्गाने प्रवासी वाहतुकीसाठी वापर करण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. बोरिवली-गोराई या वेगवान प्रवासासाठी रो-रो फेरी बोट सेवा सुरू करण्यात येत आहे. त्या दृष्टीने बोरिवलीत (मार्वे) जेट्टी बांधण्यात येणार आहे. पण कांदळवनातून जाणाऱया मार्गाची परवानगी मिळवण्यात झालेल्या पाच वर्षांच्या प्रशासकीय विलंबामुळे बोरिवली (मार्वे) जेट्टीच्या बांधकामाच्या खर्चात तब्बल 34 कोटी 27 लाख रुपयांची वाढ झाली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोराई हे पर्यटनाबरोबरच तीर्थयात्रेकरूंच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. बोरिवली व गोराई या मार्गावर सतत वाहतूककोंडी असते. त्यामुळे वेळ आणि इंधनचा खर्च अधिक होते. त्यामुळे समुद्रमार्गे मार्वे-मनोरी अशी रो-रो सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे समुद्रमार्गे रो-रो सेवा सुरू करण्याची योजना ‘सागरमाला’ प्रकल्पाअंतर्गत आखली होती. या योजनेत केंद्र सरकारचा पन्नास टक्के आणि राज्य सरकारचा पन्नास टक्के वाटा आहे.
या योजनेअंतर्गत बोरिवलीत (मार्वे चौपाटी) जेट्टी सुविधा उभारण्यासाठी 15 कोटी 47 लाख रुपयांच्या खर्चाला ऑक्टोबर 2017 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दरसूचीही तयार करण्यात आली. या कामाची निविदा प्रक्रिया राबवून सप्टेंबर 2018 मध्ये मेसर्स एमईसी-एससीसीजेव्ही या पंपनीला कार्यादेश देण्यात आले. पण या प्रकल्पातील काम हे कांदळवन क्षेत्रात येते त्यामुळे त्याबाबतची अंतिम परवानगी प्राप्त होण्यासाठी पाच वर्षांहून अधिक कालावधी लागला. त्यामुळे या काळात सिमेंट, स्टील व कामगारांच्या शुल्कात प्रचंड वाढ झाली. परिणामी महाराष्ट्र सागरी मंडळाने 49 कोटी 74 लाख रुपयांच्या रकमेचे सुधारित अंदाजपत्रक तयार करून सुधारित प्रस्तावास राज्य सरकारकडून मान्यता मिळवली आहे. मात्र या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च 34 कोटी 27 लाख रुपयांनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.