दिवाळीच्या मुहूर्तावर अरविंद केजरीवाल यांचा धमाका! BJP च्या माजी आमदाराचा AAP मध्ये प्रवेश

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडतोय. अनेक बड्या नेत्यांनी भाजपला रामराम करत महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात भाजपला एकामागून एक धक्के बसत असताना आता दिल्लीतही अरविंद केजरीवाल यांनी दिवाळीचा मुहूर्त साधत धमाका केला आहे. एका माजी आमदारने भाजपला रामराम करत आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे.

देशभरात दिवाळीची धामधूम सुरू आहे. यासोबतच राजकारणातही धमाके होत आहेत. दक्षिण दिल्ली आणि दिल्लीच्या ग्रामीण भागात प्रभाव असलेले भाजपचे माजी आमदार ब्रह्मसिंह तंवर यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. तंवर हे आतापर्यंत तीन वेळा आमदार झाले आहेत.

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ब्रह्मसिंह तंवर यांनी आज दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थित आम आदमी पार्टीत प्रवेश केला. केजरीवाल यांनी तंवर यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी तंवर यांच्यासोबत त्यांच्या अनेक समर्थकांनीही ‘AAP’मध्ये प्रवेश करत भाजपला धक्का दिला. अरविंद केजरीवाल यांच्या कार्यशैलीने मी प्रभावित झालो, असे ‘AAP’मध्ये प्रवेश केल्यानंतर ब्रह्मसिंह तंवर म्हणाले. अल्पवयीन असल्यापासून मी भाजपमध्ये काम केलं. मात्र, अनेक दिवसांपासून मी आम आदमी पार्टीचं काम बघत आलो आहे. त्यामुळे आता आम आदमी पार्टीत चांगलं काम करण्याचा विचार आपल्या मनात आला. केजरीवाल यांना भेटल्यानंतर ‘AAP’मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आणि त्यांनी मला साथ दिली, असे ब्रह्मसिंह तंवर म्हणाले.